Yugendra Pawar । महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी होताना पाहायला मिळत आहे. अशातच आता लोकसभा निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी कोणाला पाठिंबा देणार हे स्पष्ट केले आहे. यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
खुद्द युगेंद्र पवार यांनी ‘X’ वर याबाबत माहिती दिली आहे. “छत्रपती शिवरायांनी दिल्लीसमोर न झुकण्याची शिकवलेली स्वाभिमानाच्या बाणाचे रक्षण करण्यासाठी आम्ही तयार आहोत.” जय जिजाऊ, जय शिवराय.” दरम्यान, शरद पवार यांच्या कुटुंबातून आजवर त्यांची कन्या सुप्रिया सुळे, नातू रोहित पवार आणि पुतणे अजित पवार यांची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. पण आता युगेंद्र यांचीही चर्चा होत आहे. युगेंद्रच्या सोशल मीडिया प्रोफाइलनुसार सांगायचे झाले तर ते शरयू ॲग्रोचे सीईओ आहे.
कोण आहेत युगेंद्र पवार?
युगेंद्र पवार हे शरद पवार यांनी स्थापन केलेल्या विद्या प्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेचे खजिनदार असून त्यांचे शालेय शिक्षण मुंबई आणि पुण्यातून झाले आहे, तर विद्यापीठाचे शिक्षण अमेरिकेतील बोस्टन येथून झाले आहे. अमेरिकेतून परत आल्यानंतर ते वडील श्रीनिवास पवार यांच्या व्यवसायात रुजू झाले. युगेंद्र पवार हे बारामतीतही सक्रिय आहेत. ते तेथे सामाजिक कार्य करतात.
अशा वेळी बारामतीतील निवडणूक लढत कुटुंबांमध्येच होण्याची शक्यता असताना, युगेंद्र यांनी अशा प्रकारे शरद पवारांच्या समर्थनार्थ उभे राहणे अतिशय महत्त्वाचे मानले जात आहे. दरम्यान, यापूर्वी बुधवारी त्यांनी शरद पवार यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेऊन पाठिंबा दिला होता. निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष या दोघांनीही अजित पवार यांच्या बाजूने निकाल देताना त्यांच्या गटालाच खरी राष्ट्रवादी काँग्रेस अशी वर्णी लावल्याने या घडामोडी समोर आल्या आहे.