दिल्ली : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे पाकिस्तानमधील राजकारण (Politics) पुन्हा तापणार आहे. इम्रान खान यांच्या पक्षाने आता थेट निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन करण्याचे ठरवले आहे. इम्रान खान यांच्या पार्टीचे नेते फवाद चौधरी यांनी रविवारी जाहीर केले की, मुख्य निवडणूक आयुक्त यांच्या वर्तनाविरोधात 26 एप्रिल रोजी देशभरातील निवडणूक आयोग (Election Commission) कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात येईल.
चौधरी यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटद्वारे सांगितले की, रविवारी पक्षाच्या राजकीय समितीची बैठक घेण्यात आली. ज्यामध्ये निवडणूक आयोग संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. मुख्य निवडणूक आयुक्त पक्षपाती आणि अप्रामाणिक असल्याचा आरोप त्यांनी केला. चौधरी यांनी आरोप केला की पार्टीतील असंतुष्ट विधानसभा सदस्यांना काढून टाकण्याची मागणी पक्षाकडून करण्यात आली होती, परंतु निवडणूक आयोगाने अद्याप त्यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. “या संदर्भात, पीटीआय निवडणूक आयुक्तांच्या वागणुकीविरोधात मंगळवारी देशभरातील ECP कार्यालयांसमोर निदर्शने करणार आहे.
एक दिवस आधी अध्यक्ष इम्रान खान यांनी सीईसीला राजीनामा देण्यास सांगितले होते. ते म्हणाले होते, की त्यांचा पक्ष निवडणूक आयुक्तांना पक्षपाती मानतो. इम्रान म्हणाले, की त्यांच्या पार्टीचा सीईसीवर विश्वास नाही, त्यांचे सर्व निर्णय पक्षाच्या विरोधात होते. आता या निर्णयामुळे पाकिस्तानमधील राजकारणात पुन्हा गदारोळ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दरम्यान, पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी कामकाजास सुरुवात केली आहे. त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. मात्र, अजूनही देशातील राजकीय परिस्थिती पूर्वपदावर आलेली नाही. त्यात आता इम्रान खान यांनी नवा निर्णय घेतल्याने राजकारणातील वाद आधिक वाढण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
.. म्हणून पाकिस्तानमध्ये वाढणार इंधनाचे भाव; सरकारने ‘त्या’ अटी केल्या मान्य.. जाणून घ्या, डिटेल..