दिल्ली : श्रीलंकेतील आर्थिक संकटात लोकांचा संताप आता रस्त्यावर दिसून येत आहे. गुरुवारी रात्री उशिरा तेथील लोकांनी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या घराबाहेर निदर्शने केली. लोकांनी घोषणाबाजी करत राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. राष्ट्रपतींच्या राजीनाम्याची मागणी करत 5,000 पेक्षा जास्त लोकांनी श्रीलंकेच्या राजधानीत निषेध मोर्चा काढला. निदर्शने थांबवण्यासाठी निमलष्करी पोलिस आणि विशेष टास्क फोर्सला पाचारण करावे लागले.
श्रीलंकेला स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात वाईट आर्थिक मंदीचा सामना करावा लागत आहे. देश अनेक आठवड्यांपासून अन्न आणि जीवनावश्यक वस्तू, इंधन आणि गॅसच्या तीव्र टंचाईने त्रस्त आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गुरुवारी अनेक ठिकाणी पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध नव्हते.
पोस्टर फडकावत घोषणाबाजी करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी पांगवण्याचा प्रयत्न केल्याने गोंधळ सुरू झाला. जमावाने पोलिसांवर बाटल्या आणि दगडफेक केली. डिझेल न मिळाल्याने 13 तास ब्लॅकआउट पाळण्यात आले. रस्त्यावर वाहने फारशी दिसत नाहीत. औषधांच्या टंचाईमुळे आधीच शस्त्रक्रिया बंद केलेल्या सरकारी रुग्णालयांवरही या ब्लॅकआउटचा परिणाम झाला. कोलंबो स्टॉक एक्स्चेंजवरील व्यवहार अर्धा तास ते दोन तासांपर्यंत मर्यादित ठेवावे लागले आणि कार्यालयातील अनावश्यक कामगारांना घरीच राहण्यास सांगितले गेले. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने एका मंत्र्याच्या हवाल्याने सांगितले की, वीज बचत करण्यासाठी अनेक ठिकाणी पथदिवे बंद करण्यात आले आहेत.
दरम्यान, विदेशी कर्जाच्या जाळ्यात अडकलेल्या श्रीलंकेतील परिस्थिती दिवसेंदिवस अत्यंत धोकादायक होत आहे. देशाची अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. न्यूज एजन्सी एएनआयच्या वृत्तानुसार, सध्या श्रीलंकेला प्रचंड कर्ज आणि वाढत्या किमती या दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अन्नधान्य आणि इंधनाची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांचा संयम सुटला असून ते आता सरकारच्या विरोधात आक्रमक झाले आहे. या देशात हे संकट निर्माण होण्यात चीनचेही मोठे योगदान आहे. कारण, या देशावर चीनचे अब्जावधींचे कर्ज आहे. लोकांनी याआधी सुद्धा राष्ट्रपतींच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता.
चीनच्या कृपेने श्रीलंका बेहाल..! पहा काय वाईट स्थिती झालीय शेजारी देशाची
कर्जाने बेहाल.. महागाईने केले हैराण; आता लोकही सरकारवर भडकले; पहा, काय सुरू आहे ‘या’ देशात..?