युद्धाबाबत रशियाचा मोठा खुलासा..! दुसऱ्या टप्प्यातील प्लान केलाय उघड; पहा, काय सुरू आहे युद्धाच्या मैदानात..
दिल्ली : आता एक महिना उलटून गेला तरीही रशिया आणि युक्रेनचे युद्ध सुरुच आहे. या युद्धात युक्रेनचे अतोनात नुकसान झाले तरीसुद्धा हा देश अजूनही रशियाला टक्कर देत आहे. रशिया विरोधात अन्य देशही युक्रेनला मदत करत आहेत. त्यामुळे हे युद्ध मिटलेले नाही. त्यातच आता रशियाच्या वरिष्ठ जनरलने मोठा खुलासा केला आहे. युक्रेनमधील रशियन लष्करी कारवाईचा पहिला टप्पा आता पूर्ण झाला आहे, असे या रशियन जनरलने म्हटले आहे. रशियाच्या जनरल स्टाफचे फर्स्ट डेप्युटी चीफ कर्नल जनरल सर्गेई रुडस्कॉय यांनी मीडियाला सांगितले, की सर्वसाधारणपणे ऑपरेशनच्या पहिल्या टप्प्यातील सर्व मुख्य कामे पूर्ण झाली आहेत.
रुडस्कॉय यांनी म्हटले आहे, की युक्रेनच्या (Ukraine) सशस्त्र दलांची लढाऊ क्षमता लक्षणीयरित्या कमी झाली आहे. अशा स्थितीत मुख्य उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न केंद्रित केले जातात. आणि हे मुख्य लक्ष्य डॉनबास प्रांतास स्वतंत्र करणे आहे. जोपर्यंत रशियन सैन्य डॉनबास आणि लुहान्स्कला मुक्त करत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही असे त्यांनी म्हटले आहे. तत्पूर्वी, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) म्हणाले की युद्ध (War) “नियोजनानुसार” सुरू आहे.
कीव आणि खार्किवजवळ रशियन सैन्य थांबताना दिसत असताना रशियाने (Russia) ही माहिती दिली आहे. युक्रेनच्या मीडियानुसार, युद्ध सुरू झाल्यापासून हजारो रशियन सैनिक मारले गेले आहेत. सीएनएनच्या अहवालात असे दिसून आले आहे, की रशिया देखील युक्रेनमध्ये हवाई ताकद मिळविण्यात अपयशी ठरला आहे.
कर्नल जनरल सर्गेई रुडस्कॉय 25 मार्च रोजी आग्रही होते, की रशियाचे उद्दिष्ट युक्रेनच्या डॉनबास क्षेत्राला ‘मुक्त’ करण्याचे आहे. रुडस्कॉय यांनी सांगितले, की युक्रेनमध्ये आतापर्यंत 1351 रशियन लष्करी कर्मचारी मारले गेले आहेत आणि 3,825 जखमी झाले आहेत. मात्र, नाटोच्या (Nato) म्हणण्यानुसार या युद्धात 15,000 हून अधिक रशियन सैनिक मारले गेले आहेत. आम्ही नागरिकांना लक्ष्य करत नाही, आम्ही फक्त लष्करी तळांना लक्ष्य करत आहोत, असे रशिया सातत्याने सांगत आला आहे. तथापि, खात्री करणारे बरेच पुरावे आहेत की रशियन सैन्याने अनेक रुग्णालये, शाळा, अपार्टमेंट आणि नागरिकांना लक्ष्य केले आहे.
रशियाला आणखी एक झटका देण्याची तयारी.. अमेरिका-युरोपने केलाय ‘हा’ मोठा करार..