युद्धाचे चटके..! तब्बल 1 कोटी युक्रेनी लोक आलेत रस्त्यावर.. पहा, नेमके काय घडलेय युद्धग्रस्त देशात..
दिल्ली : रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळे युक्रेनियन लोकांना आपला देश सोडावा लागला आहे. युनायटेड नेशन्स हाय कमिश्नर फॉर रिफ्युजी (UNHCR) ने सांगितले की, रशियन आक्रमणामुळे तब्बल 1 कोटी युक्रेनियन निर्वासित परदेशात निघून गेले आहेत किंवा देशातच विस्थापित झाले आहेत. यूएन निर्वासित एजन्सीचे प्रमुखांनी सांगितले की, रशिया (Russia) आणि युक्रेनमधील (Ukraine) वाढत्या संघर्षामुळे लाखो युक्रेनियन लोकांना त्यांची घरे सोडून दुसऱ्या देशात आश्रय घेणे भाग पडले आहे.
यूएनएचसीआरच्या कार्यालयाने सांगितले, की परदेशात पळून गेलेल्या युक्रेनियन लोकांची संख्या 3.38 दशलक्षांपेक्षा जास्त आहे. निर्वासितांपैकी सुमारे दोन तृतीयांश म्हणजेच सुमारे 2.05 दशलक्ष लोक शेजारील देशात गेले आहेत आणि सुमारे 1,80,000 रशियामध्ये आहेत. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशनने सांगितले की बुधवारपर्यंत युक्रेनमध्ये विस्थापित लोकांची संख्या 6.48 दशलक्ष असल्याचा अंदाज आहे.
इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन (IOM) च्या अंदाजानुसार गेल्या तीन आठवड्यात युक्रेनने विस्थापनात सीरियाला मागे टाकले आहे, जिथे 2010 मध्ये सर्वात भीषण युद्ध सुरू झाले होते. आतापर्यंत, सीरियातील 1 कोटी 30 लाखांपेक्षा जास्त लोक एकतर विस्थापित झाले आहेत किंवा देश सोडून गेले आहेत. संयुक्त राष्ट्र संघटनेचा हा अंदाज शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या एका दस्तावेजाद्वारे समोर आला आहे.
युक्रेनच्या मारियुपोल सिटी कौन्सिलने दावा केला आहे की नागरिकांना त्यांच्या इच्छेविरुद्ध रशियात नेले जात आहे, तर एका खासदाराने दावा केला आहे की त्यांना रशियाच्या दुर्गम भागात काम करण्यास भाग पाडले जात आहे. सिटी कौन्सिलने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “युक्रेनमधील लोकांना रशियात जाण्यास भाग पाडले जात आहेत. गेल्या आठवड्यात अनेक हजार मारियुपोल रहिवाशांना रशियन प्रदेशात नेण्यात आले आहे.