Russia-Ukraine War : फक्त रशियाच नाही तर जगालाच बसणार झटका.. पहा, कसे होणार युद्धाचे दुष्परिणाम..?
दिल्ली : रशियाने युक्रेन विरोधात युद्ध पुकारले आहे. आज 13 दिवसांनंतरही युद्ध थांबलेले नाही. या काळात रशियाने युक्रेनचे अतोनात नुकसान केले आहे. तर दुसरीकडे रशियाचेही मोठे नुकसान होत आहे. रशियाच्या या कृत्यामुळे जगातील अनेक देशांनी रशियावर अत्यंत कठोर आर्थिक निर्बंध टाकले आहेत. या निर्बंधांचा फटका रशियाला बसत आहे. रशियावर रोजच नवीन निर्बंध टाकले जात असल्याने आजमितीस रशिया हा जगातील सर्वाधिक निर्बंधांचा सामना करणारा देश ठरला आहे. या निर्बंधांमुळेच रशियाच्या अर्थव्यवस्थेला जबर झटका बसणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, फक्त रशियाच नाही तर या युद्धाचा त्रास अवघ्या जगाला सहन करावा लागणार आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या व्यवस्थापकीय संचालकांनी सांगितले, की युक्रेनच्या युद्धामुळे झालेले नुकसान भरून काढणे सध्या अशक्य आहे. युक्रेनमधील लोकांसह आर्थिक पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लाखो लोकांनी आपली घरे आणि रोजगार सोडले आहेत. उद्योग बंद आहेत, जे युद्धानंतर पूर्वपदावर येण्यास बराच काळ जाणार आहे.
जागतिक बँकेचे अध्यक्ष म्हणतात, की युक्रेनची अर्थव्यवस्था जगाच्या अर्थव्यवस्थेला झटका देणार आहे. जगातील अनेक देश युक्रेनवर अवलंबून होते, त्यामुळे येणाऱ्या काळात अनेक प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागणार आहे. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याचा सर्वाधिक फटका जगातील गरीब देशांना बसणार आहे. रशिया युक्रेनच्या प्रमुख शहरांवर ज्याप्रकारे हमले करत आहे त्यानुसार युक्रेनला असहाय्य बनवायचे आहे, असे आर्थिक तज्ज्ञांचे मत आहे. रशियाने सध्या ज्या शहरांवर हमला केला आहे ती शहरे आर्थिक दृष्टिकोनातून महत्त्वाची आहेत. ही शहरे रशियन कारवाईमुळे जवळजवळ उद्धवस्त झाली आहेत. अशा स्थितीत ही शहरे युद्धानंतर उभी राहण्यास बराच कालावधी जाणार आहे.
दरम्यान, आता अमेरिकेनेही रशियाकडून कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू खरेदीवर निर्बंध टाकले आहेत. युरोपिय देशांचाही तसा विचार आहे. यामुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान होणार आहे. दुसरीकडे रशियाने जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा पुरवठा बंद करण्याचा इशारा दिला आहे. जर प्रत्यक्षात तसे घडले तर अनेक देशात इंधनाच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढतील.
रशियानंतर आता चीनही ‘NATO’ वर भडकला..! पहा, युद्धाबाबत काय केलाय गंभीर आरोप..?