Russia-Ukraine War : .. म्हणून रशियाने पुन्हा युद्ध थांबवले.. पहा, कशासाठी घेतलाय ‘हा’ मोठा निर्णय..?
दिल्ली : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा आज बारावा दिवस आहे. या बारा दिवसांच्या काळात रशियाने युक्रेनचे अतोनात नुकसान केले आहे. लाखो लोकांनी देश सोडला आहे. शहरे उद्धवस्त झाली आहेत. अजूनही अनेक लोक या संकटग्रस्त देशांत अडकून पडले आहे. या देशातून बाहेर पडण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. अखेर या लोकांना बाहेर काढण्याच्या उद्देशाने रशियाने पुन्हा काही काळासाठी युद्धविराम घोषित केला आहे. स्पुतनिकच्या रिपोर्टनुसार, हा युद्धविराम 12.30 वाजता सुरू होईल. या दरम्यान युद्धात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी मानवतावादी कॉरिडॉर तयार केले जातील. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या आवाहनानंतर रशियाने युद्धविराम जाहीर केला आहे.
रशियाने युक्रेनमध्ये युद्धविराम घोषित करण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी दोन शहरांमध्ये 24 तासांसाठी युद्धविराम करण्यात आला होता. या दरम्यान भारतीय नागरिकांना बाहेर पडण्यासाठी मार्ग देण्यात आला. मारियुपोल, खार्किव, कीव आणि सुमीमध्ये युद्धविराम घोषित करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रशियन लष्कराने युद्धविराम जाहीर केल्यानंतर युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिकांना तेथून बाहेर पडता येणार आहे.
सोमवारी सकाळी रशियाने युक्रेनच्या खार्किव शहरातील निवासी इमारतींना लक्ष्य केले. लोकांना आधीच बंकरसह सुरक्षित ठिकाणी जाण्याचे सांगण्यात आले होते. परंतु तरीही काही लोक तेथे अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी शनिवारी युक्रेनचा राष्ट्राच दर्जा धोक्यात असल्याचा इशारा दिला.
त्यांनी रशियावरील पाश्चात्य निर्बंधांची तुलना युद्धाच्या घोषणेशी केली. रशियन सैन्याने युक्रेनियन शहरांना वेढा घातला आहे आणि देश सोडून पळून जाण्यास भाग पडलेल्या युक्रेनियन नागरिकांची संख्या 1.4 दशलक्षाहून अधिक झाली आहे. यासाठी पुतिन सतत युक्रेनच्या नेतृत्वाला जबाबदार धरत आहेत. ते असेच करत राहिले तर भविष्यात ते युक्रेनचा राष्ट्रीय दर्जा धोक्यात आणत आहेत. तसे घडले तर ते सर्वस्वी त्यांच्या निर्णयावर अवलंबून असेल.