Russia-Ukraine War : रशियातही उडालाय हाहाकार..! युक्रेनसाठी हजारो रशियन रस्त्यावर; पहा, काय आहे नेमका प्रकार..?
दिल्ली : रशियाने युक्रेन विरोधात युद्ध सुरू करुन या देशावर कब्जा करण्याचा प्रयत्न चालवला आहे. रशियाच्या या कृत्याचा जगभरातून निषेध होत आहे. अनेक देशांनी रशियावर कठोर आर्थिक निर्बंध टाकले आहेत. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला जबर झटके बसत आहेत. आता तर देशातही विरोध सुरू झाला आहे. लाखो रशियन नागरिक रस्त्यावर उतरुन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या कारनाम्यावर संताप व्यक्त करत आहेत. येथे किमान 56 शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने होत आहेत. पोलिसांनी रविवारी आणखी 4300 जणांना ताब्यात घेतले आहे. लोकांनी पुतिन यांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. पोलिसांनी 3500 लोकांना अटक केल्याची माहिती रशियाच्या गृह मंत्रालयाने याआधी दिली होती.
मंत्रालयाने सांगितले की, 5200 लोकांनी निदर्शनांमध्ये भाग घेतला. ओवीडी-इन्फो प्रोटेस्ट मॉनिटरिंग ग्रुप यांच्या मते, 56 वेगवेगळ्या शहरांमध्ये किमान 4366 लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. युक्रेनच्या आक्रमणाविरुद्ध रशियन लोक आपला राग व्यक्त करण्यासाठी विविध पद्धती वापरत आहेत. काही लोकांनी युक्रेनचे झेंडे फडकावत युद्ध आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या विरोधात घोषणा दिल्या आहेत.
गेल्या 11 दिवसात या युद्धात अनेक लोकांचा मृत्यू झाला असून 15 लाख लोकांनी दुसऱ्या देशात आश्रय घेतला आहे. रविवारी सुद्धा देशात अनेक ठिकाणी निदर्शने आणि रॅली काढण्यात आली. रशियन लोक युद्धाच्या विरोधात होते. तर काही लोक रशियाला समर्थनही करताना दिसले. या लोकांनी सध्या निर्माण झालेल्या या परिस्थितीस पश्चिमी देश आणि नाटोच्या रशिया विरोधी धोरणांना जबाबदार धरले.
दरम्यान, रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी ब्रिटनवर निशाणा साधताना ब्रिटनने मुद्दाम युद्धात उतरल्याचे म्हटले आहे. तसेच ब्रिटनला या निर्बंधांची मोठी किंमत द्यावी लागेल असेही ते म्हणाले. रशियन परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे, की ब्रिटनने स्पष्टपणे रशियाशी उघड संघर्षाकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रिटेनला रशियाशी थेट युद्ध करायचे आहे, असे रशियाने म्हटले आहे. याआधी, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी शनिवारी सांगितले की, जो कोणताही देश युक्रेनमध्ये नो-फ्लाय जोन करेल, आम्ही त्या देशास युद्धात सहभागी देश म्हणून मानू.