Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

पेशावर सुसाईड अटॅकमध्ये 56 बळी..! बॉम्बस्फोटामुळे ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर प्रश्नचिन्ह..?

दिल्ली : भारताचा शेजारी देश पाकिस्तान म्हणजे दहशतवादी हल्ल्याच्या भीतीखाली जगणारा देश अशीच ओळख झाली आहे. कारण आताही पाकिस्तानातील पेशावर येथे झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात 56 जणांचा मृत्यू झाला आहे. हल्लेखोराने शुक्रवारी नमाज अदा करण्यासाठी मशिदीत जमलेल्या जमावाला लक्ष्य केल्याचे सांगितले जात आहे. या घटनेत 190 हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना पेशावरच्या लेडी रीडिंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्फोटानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या शेजाऱ्यांनी त्यांच्या मोटरसायकल आणि कारमधून जखमींना रुग्णालयात दाखल केले. (Peshawar Suicide Attack)

Advertisement

जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, पोलीस आणि इतर सुरक्षा दलांनी स्फोट क्षेत्राला वेढा घातला आहे. हा स्फोट घडवणाऱ्या आत्मघातकी हल्लेखोराचे सहकारी जवळच असावेत, असा पोलिसांचा संशय आहे. लेडी रीडिंग हॉस्पिटलच्या प्रवक्त्याने सांगितले की, जखमींपैकी 10 जणांची प्रकृती गंभीर आहे. अशा परिस्थितीत मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. पेशावरचे कॅपिटल सिटी पोलिस अधिकारी (सीसीपीओ) एजाज अहसान यांनी या हल्ल्यात एक पोलिस अधिकारी ठार झाल्याची पुष्टी केली. त्याचवेळी लेडी रीडिंग हॉस्पिटलचे मीडिया मॅनेजर असीम खान यांनी सांगितले की, आतापर्यंत 30 मृतदेह रुग्णालयात आणण्यात आले आहेत. एजाज अहसान यांनी सांगितले की, प्राथमिक वृत्तानुसार दोन हल्लेखोरांनी पेशावरच्या किस्सा ख्वानी बाजार येथील मशिदीत घुसण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सर्वप्रथम मशिदीच्या सुरक्षेत तैनात असलेल्या पोलिसांवर गोळीबार केला. या घटनेत एक पोलीस जागीच ठार झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. या हल्ल्यानंतर काही वेळातच मशिदीत मोठा स्फोट झाला.

Loading...
Advertisement

मोठी गोष्ट म्हणजे ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीम या हल्ल्याच्या काही तास आधी पाकिस्तानात पोहोचली होती. त्याच्या सुरक्षेबाबत आधीच चिंता व्यक्त केली जात होती. आता या हल्ल्यामुळे पाकिस्तानच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. 2009 मध्ये श्रीलंकेच्या संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तब्बल 10 वर्षे पाकिस्तानमध्ये एकही कसोटी सामना झाला नाही. 2011 च्या विश्वचषक स्पर्धेचे यजमानपदही संघाकडून हिसकावून घेण्यात आले. ऑस्ट्रेलियाचा दौरा ही पाकिस्तान क्रिकेटसाठी प्रतिमा सुधारण्याची मोठी संधी असल्याचे सांगितले जात होते, मात्र आता त्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Advertisement
Advertisement

Leave a Reply