Russia-Ukraine War : अमेरिका नाराज, तरीही भारत रशियाच्या विरोधात नाहीच.. पहा, संयुक्त राष्ट्रसंघात पुन्हा काय घडले..?
जिनेव्हा : संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत (UNHRC) रशियाविरोधात भारताने यावेळी सुद्धा कोणतेही भाष्य केले नाही. चौथ्या वेळेस हा प्रकार घडला आहे. याआधीही तीन वेळा भारताने रशियाविरोधात काहीही म्हटले नाही. रशियाने युक्रेनवर केलेल्या लष्करी कारवाईची चौकशी करण्याच्या प्रस्तावावरील मतदानातही भारताने भाग घेतला नाही. तथापि, UNHRC ने युक्रेन विरुद्ध रशियाच्या लष्करी कारवाईची चौकशी करण्यासाठी एक स्वतंत्र आंतरराष्ट्रीय आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
47 सदस्यीय यूएन कौन्सिलने युक्रेनमधील मानवाधिकार परिस्थितीवरील मसुद्याच्या ठरावावर मतदान केले. प्रस्ताव मंजूर झाला. 32 देशांनी ठरावाच्या बाजूने आणि दोन मते (रशिया आणि इरिट्रिया) विरोधात मतदान केले. तर भारत, चीन, पाकिस्तान, सुदान आणि व्हेनेझुएलासह 13 देशांनी मतदानात भाग घेतला नाही. ठरावाच्या बाजूने मतदान करणाऱ्या देशांमध्ये फ्रान्स, जर्मनी, जपान, नेपाळ, युएई, ब्रिटेन आणि अमेरिका यांचा समावेश आहे.
“रशियाने युक्रेनवर केलेल्या लष्करी कारवाईचा परिणाम म्हणून, मानवाधिकार परिषदेने त्वरित एक स्वतंत्र आंतरराष्ट्रीय चौकशी आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे,” असे परिषदेने ट्विट केले. मागील सात ते आठ दिवसांत भारताने 15 राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत युक्रेनवरील दोन ठराव आणि 193 सदस्यीय सभेतील एका ठरावावर मतदान करणे टाळले आहे.
याआधी युक्रेनवर हमला केल्याबद्दल युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने (UNGA) बुधवारी रशियाचा निषेध करणारा ठराव मंजूर केला होता. या ठरावाला 193 पैकी 141 सदस्यांनी एकमताने पाठिंबा दिला. ठरावाने युक्रेनच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेच्या वचनबद्धतेचे समर्थन केले आणि रशियाला युक्रेनच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरून आपले सैन्य त्वरित मागे घेण्याचे आवाहन केले.
या ऐतिहासिक ठरावात रशिया, बेलारूस, इरिट्रिया, उत्तर कोरिया आणि सीरिया या 5 देशांनी ठरावाच्या विरोधात मतदान केले, तर भारतासह 34 देशांनी मतदानात भाग घेतला नाही. भारताच्या या कार्यवाहीवर अमेरिकेने नाराजी व्यक्त केली होती. भारतावर देखील निर्बंध टाकावेत, असेही सांगण्यात येत होते.