दिल्ली : रशियन सैन्याने आज युद्धाच्या नवव्या दिवशी युरोपमधील सर्वात मोठ्या अणुप्रकल्पाला लक्ष्य केल्याने एकच खळबळ उडाली आहे. चांगली गोष्ट म्हणजे हमल्यानंतर रेडिएशनची पातळीही सामान्य होती. रशियन सैन्याने प्लांटचे प्रशासन आणि नियंत्रण इमारतींवर कब्जा केला आहे. या हमल्यात कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. दुसरीकडे या घटनेनंतर जगात खळबळ उडाली आहे. झेलेन्स्की यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याबरोबर संवाद साधला.
प्रकल्पावर हमला झाल्यानंतर लगेचच युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा म्हणाले, की रशियन सैन्याने प्लांटवर चारही बाजूंनी गोळीबार केला. जर त्याचा स्फोट झाला तर तो चेर्नोबिलपेक्षा 10 पट मोठा असेल. जिथे 6 अणुभट्ट्या आहेत. पॉवर प्लांटच्या जागेजवळ रेडिएशनची जास्त पातळी आढळून आली आहे. ब्रिटीश पंतप्रधानांनी झेलेन्स्कीना सांगितले, की ते रशिया आणि इतर जवळच्या मित्र देशांबरोबर या मुद्द्यावर संवाद साधणार आहेत. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक बोलावण्याबाबतही त्यांनी सांगितले. ब्रिटनच्या पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, रशियाने हमले करणे ताबडतोब थांबवावे यावर दोन्ही नेत्यांचे एकमत झाले.
इकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिडेन यांनीही अणु प्रकल्पावरील हमल्यानंतर चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते आता रशियाने युद्धविराम घोषित करणे गरजेचे आहे. ते म्हणाले, की रशियाने आपत्कालीन पथकाला प्लांटमध्ये प्रवेश करण्याची परवानगी द्यावी. इंटरनॅशनल अॅटोमिक एनर्जी एजन्सी (IAEA) ने ट्विटमध्ये म्हटले आहे, की IAEA युक्रेनच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे आणि झापोरिझिया न्यूक्लियर पॉवर प्लांटवरील गोळीबाराबद्दल त्यांना माहिती आहे. IAEA महासंचालक या मुद्द्यावर युक्रेनचे पंतप्रधानांबरोबर चर्चा केली.
दरम्यान, युक्रेनवर आक्रमण करण्याच्या योजनेला रशियाने 18 जानेवारीलाच मान्यता दिली होती आणि 15 दिवसांत युक्रेनवर कब्जा करण्याची तयारी सुरू होती. रशियाच्या गुप्त युद्ध दस्तऐवजातून ही खळबळजनक माहिती समोर आली आहे. युक्रेनच्या संयुक्त लष्करी ऑपरेशन विभागाने या कागदपत्रांच्या आधारे एका सोशल मिडीया पोस्टमध्ये हा दावा केला आहे. युक्रेनने आंतरराष्ट्रीय न्यायालयात रशियाविरुद्ध खटला दाखल केला असून त्यावर लवकरच सुनावणी होणार आहे.
लष्करी विभागाच्यावतीने पोस्टमध्ये म्हटले आहे, की युक्रेनियन सैन्याच्या एका युनिटच्या ऑपरेशननंतर रशियन सैनिकांनी केवळ शस्त्रेच सोडली नाहीत तर त्यांनी काही गुप्त कागदपत्रे देखील सोडली आहेत. युक्रेनच्या लष्करी आदेशानुसार, या दस्तऐवजांवरून असे दिसून आले आहे की जानेवारीमध्ये युद्ध योजना मंजूर झाल्यानंतर युक्रेनचा ताबा 20 फेब्रुवारी ते 6 मार्च दरम्यान 15 दिवसांत पूर्ण करायचा होता. युक्रेनवर हमला कोणत्या दिशेने आणि कसा करायचा हे देखील कागदपत्रांमध्ये स्पष्ट केले आहे.