Russia-Ukraine War : ब्रिटेननंतर अमेरिकेनेही युक्रेनला दिलाय झटका; युक्रेनला ‘ती’ मदत मिळणार नाहीच..
दिल्ली : युक्रेनविरुद्ध रशियाचे आक्रमण बुधवारी सातव्या दिवशीही सुरूच आहे. राजधानी कीव आणि खार्किवसह अनेक प्रमुख शहरांना लक्ष्य केले जात आहे. युक्रेन युद्धा दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी आपल्या भाषणात रशियाच्या युक्रेनवरील हमल्याचा निषेध केला आणि पुतीन यांना अप्रत्यक्षपणे इशारा दिला.
ते म्हणाले, की हुकूमशहांना नेहमीच किंमत द्यावी लागते. त्याचवेळी युक्रेनमधील युद्धात अमेरिकन सैन्य सहभागी होणार नाही, असेही बायडेन यांनी दुसऱ्याच क्षणी स्पष्ट केले. जो बायडेन यांनी रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाला जागतिक शांततेसाठी धोका असल्याचे म्हटले आहे. रशियाने कोणताही इशारा न देता युक्रेनवर हमला केला.
अमेरिका युक्रेनसोबत आहे. पुतिन यांना वाटले, की पाश्चिमात्य देश आणि नाटो प्रतिक्रिया देणार नाहीत. त्यांना युरोप विभाजित करायचा होता, पण आम्ही एकत्र आहोत आणि यापुढेही एकत्र राहू. युक्रेनने रशियाच्या खोटेपणास प्रामाणिकपणे उत्तर दिले आहे. अमेरिकेचे सैन्य रशियाच्या विरोधात लढणार नाही, पण रशियाला मनमानी कारभार सुद्धा करू दिला जाणार नाही, असा इशारा बायडेन यांनी दिला.
रशियाची आर्थिक व्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. आम्ही रशियावर आर्थिक निर्बंध लादत आहोत. युक्रेनला 100 दशलक्ष डॉलर्सची मदत देणार आहोत. रशियाने जगाचा पाया हादरवण्याचा प्रयत्न केला आहे. याची किंमत रशियाला द्यावी लागेल. ही लढाई लोकशाही विरुद्ध हुकूमशाहीची आहे. आता हुकूमशहाला त्याच्या कृत्यांची शिक्षा देणे खूप गरजेचे आहे.
रशियन विमानांसाठी अमेरिकेचे हवाई क्षेत्र बंद करण्यात आले आहे. आम्ही नाटोच्या प्रत्येक इंच जमिनीचे संरक्षण करू. पुतिन आज आधीपेक्षा जास्त अलिप्त आहेत. आज 27 देश युक्रेनसोबत आहेत. रशियन शेअर बाजार 40 टक्क्यांनी खाली आला आहे. युक्रेनियन धैर्याने संघर्ष करत आहेत. पुतिन यांना रणांगणावर फायदा होऊ शकतो, परंतु दीर्घकाळासाठी ते त्यांना परवडणारे नाही, असेही बायडेन यावेळी म्हणाले.
दरम्यान, याआधी ब्रिटेनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनीही रशियाविरोधात आमचे सैन्य लढणार नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, दुसऱ्या मार्गाने म्हणजेच रशियावर आर्थिक निर्बंध टाकून उत्तर दिले जाईल, असे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर आता बायडेन यांनीही अशाच प्रकारचे वक्तव्य केले आहे. म्हणजेच, अमेरिका आणि युरोपीय देशांनी या युद्धात युक्रेनला अक्षरशः वाऱ्यावर सोडून दिले आहे. त्यामुळे आज युद्ध सुरू होऊन सात दिवस उलटल्यानंतरही युक्रेन एकटार रशियाला टक्कर देत आहे.
Russia-Ukraine War : म्हणून ब्रिटेन घाबरलाय रशियाला..पहा, काय केलीय मोठी घोषणा..?