कीव / मॉस्को : युक्रेन आणि रशिया यांच्यात सलग पाचव्या दिवशी भीषण युद्ध सुरूच आहे. रशियन सैन्याने युक्रेनची राजधानी कीव शहराला वेढा घातला असून सर्वत्र रशियन रणगाडे दिसत आहेत. नाटो देशांच्या निर्बंधांमुळे संतप्त झालेल्या रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी आपल्या अण्वस्त्र शक्तीला सतर्क केले आहे. दरम्यान, रशियाचा ‘सर्वोत्तम मित्र’ असलेल्या बेलारूस देशाने आता युक्रेनबाबत पाश्चात्य देशांवर डोळे वटारले असून तिसऱ्या महायुद्धाचा इशारा दिला आहे. बेलारूसचा हुकूमशहा अलेक्झांडर लुकाशेन्को याने रशियाला त्यांच्या देशात अणुबॉम्ब ठेवण्याची गळ घातली आहे. (Alexander Lukashenko On Russia Nuclear Weapons)
बेलारूसची सीमा युक्रेनशी लागून आहे. रशिया आणि युक्रेनमधील या युद्धात बेलारूस अधिकृतपणे वेगळा झाला होता, मात्र आता बेलारूसचे सैन्य पुतीन यांच्या लष्करासोबत सामील होण्याची भीती अमेरिकेकडून व्यक्त केली जात आहे. नुकतेच बेलारूसमध्ये सरावासाठी गेलेले रशियन सैनिक चेरनोबिलमार्गे युक्रेनमध्ये दाखल झाले आहेत. कीव इंडिपेंडंटच्या अहवालानुसार, बेलारूस आपला अण्वस्त्र नसलेला दर्जा आणि तटस्थ राहण्याचा निर्णय संपवणार आहे. युक्रेनच्या युद्धात पुतिन किंवा पाश्चात्य देशही झुकायला तयार नाहीत. रशियावर अनेक कठोर निर्बंध लादणाऱ्या पाश्चात्य देशांनी आता बेलारूसला लढाऊ विमानेही देण्याची घोषणा केली आहे. याआधी पाश्चात्य देशांनी युक्रेनला हजारोंच्या संख्येने स्टिंगर क्षेपणास्त्रे, जेव्हलिन रायफल दिल्या आहेत. या शस्त्राच्या जोरावर युक्रेनच्या लष्कराने रशियाचे मोठे नुकसान केले आहे. बेलारूसने रशियाला आपल्या देशात अणुबॉम्ब ठेवण्याची परवानगी दिल्याने युद्धाला आता नवे वळण लागलेले दिसते.