दिल्ली : रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आज चौथा दिवस आहे. युक्रेन आणि रशिया यांच्यात भीषण युद्ध सुरू असताना मुत्सद्देगिरी सुरू असल्याचीही चर्चा आहे, मात्र त्यावर आतापर्यंत तोडगा निघालेला नाही. दरम्यान, रशियन सैन्याने रुग्णवाहिका देखील उद्धवस्त केल्या आहेत, असा आरोप युक्रेनने केला आहे.
युक्रेनच्या रहिवासी भागातही रशियन सैनिकांचे हमले सुरुच आहेत. त्याचवेळी युक्रेनचे सैनिकही आघाडीवर उभे आहेत. दोन्ही देशांमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्ष कार्यालयाकडून रशियन सैनिकांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. युक्रेनचा दावा आहे, की रशियन सैन्य रुग्णवाहिका सोडत नाही, सर्वकाही नष्ट करून पुढे जात आहे. युक्रेनचे विधान अधिक गंभीर आहे कारण रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी याआधीच युक्रेनमध्ये सत्तापालट करणे हे आपले ध्येय आहे, सामान्य लोकांचे नुकसान करणे नाही, असे म्हटले होते.
युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी सकाळी सांगितले की, रशियाने रहिवासी भागांवर हमला केला आहे. देशात सर्वकाही उद्धवस्त करुन टाकले आहे. त्यामुळे युक्रेनचे अतोनात नुकसान झाले आहे. युद्ध थांबवून दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू करण्यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अद्याप याबाबत काही स्पष्ट नाही.
दरम्यान, रशियाने शनिवारी आपल्या सैन्याला युक्रेनमधील कारवाया तीव्र करण्यास सांगितले. कीवने वाटाघाटी करण्यास नकार दिल्याचा आरोप रशियाने युक्रेनवर केला. त्यानंतर आता युक्रेनला सर्व बाजूंनी घेरले जाईल. याआधी युक्रेनने रशियाकडून कोणत्याही चर्चेचा प्रस्ताव न दिल्याचा आरोप केला होता.
युक्रेनच्या अध्यक्षीय कार्यालयाचे प्रमुख मिखाईल पोडोलियाक यांनी रशियावर आपल्या बाजूने चर्चेची ऑफर दिल्याचा खोटा दावा केल्याचा आरोप केला आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे सचिव दिमित्री पेस्कोव्ह यांनी सांगितले, की व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनला चर्चेसाठी युद्ध थांबवण्यास सांगितले होते. परंतु युक्रेनने नकार दिला. याबाबत मिखाईल म्हणाले की, आम्ही कोणत्याही चर्चेची शक्यता नाकारली नाही. ते म्हणाले, की युक्रेन आणि राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की रशियाच्या बाजूची कोणतीही अट नाकारत आहेत.
Russia-Ukraine War : ‘त्या’ मुद्द्यावर चीनने दिलाय ‘हा’ इशारा.. पहा, नेमके काय म्हटलेय चीनने.?