मुंबई : पाकिस्तानातील सिंध प्रांतात सध्या पाणीटंचाई आहे. थरपारकर जिल्ह्यातील मिठी शहरात वाढत्या जलसंकटाच्या विरोधात लोकांनी पाकिस्तान सरकारच्या विरोधात निदर्शने केली. डॉन वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, या निदर्शनांमध्ये सामान्य जनताही सहभागी होती. संपूर्ण जिल्ह्यातील पाणी संकटाला सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
येथे कोट्यावधी रुपये खर्च करुन तयार केलेले पाणीपुरवठा प्रकल्प बंद पडले आहेत. त्यामुळे आता शहरातील रहिवाशांना जादा दराने पाण्याचे डबे विकत घ्यावे लागत आहेत. पुढे, आंदोलकांनी सांगितले की त्यांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करणे परवडत नाही त्यांना विहिरींचे अत्यंत खराब पाणी पिण्यास भाग पाडले जात आहे. पाकिस्तानमध्ये येत असलेल्या पाण्याच्या संकटावर हा निषेध करण्यात आला आहे, जो देशाच्या स्थिरतेसाठी घातक ठरू शकतो.
टोरंटोस्थित थिंक टँक इंटरनॅशनल फोरम फॉर राइट्स अँड सिक्युरिटी (IFFRAS) च्या मते, पाण्याच्या संकटामुळे निदर्शने सुरू झाली आहेत. त्यामुळे पाकिस्तानच्या बिघडलेल्या अर्थव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो. त्याच वेळी, प्रांतांमधील वादांमुळे अंतर्गत अशांतता देखील वाढू शकते. सिंध आणि बलुचिस्तान प्रांतातील शेतकऱ्यांनी सिंधू नदीतून त्यांच्या वाट्याचे पाणी सोडावे या मागणीसाठी प्रमुख महामार्ग रोखण्यास सुरुवात केली आहे.
थिंक टँकने म्हटले आहे की सर्वात श्रीमंत आणि राजकीयदृष्ट्या वर्चस्व असलेल्या पंजाब प्रांतावर नदीच्या पाण्याचे सर्वाधिक आणि अवास्तव वाटप केल्याचा आरोप केला जातो. दुसरीकडे इतर प्रांतात मात्र पाण्याची भीषण टंचाई निर्माण होते. लोकांना वारंवार या समस्येचा सामना करावा लागतो. इतक्या वर्षांनंतरही पाकिस्तान सरकारला देशातील पाण्याचा प्रश्न मिटवता आलेला नाही. त्यामुळे देशात पाण्याच्या मुद्द्यावर सातत्याने वाद होत असतात.