दिल्ली : युक्रेन विरोधात युद्ध पुकारल्यामुळे रशिया जगातील अनेक देशांच्या रडारवर आला आहे. या देशांनी रशियावर अनेक प्रकारचे निर्बंध टाकले आहेत. त्यामुळे रशियाच्या अडचणी वाढल्या आहेत. मात्र, तरी सुद्धा आता रशियाने या देशांनाही जशास तसे उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. ब्रिटेनने रशियावर अनेक प्रकारचे प्रतिबंध टाकले त्यामुळे संतापलेल्या रशियानेही ब्रिटेनला जोरदार झटका दिला आहे.
रशियाने ब्रिटिश एअरलाइन्सला त्यांच्या विमानतळांवर उतरण्यास बंदी घातली आहे. एयरोफ्लोटवर ब्रिटनच्या बंदीला प्रतिसाद म्हणून, रशियाच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाने रशियन हवाई क्षेत्रात ब्रिटेनच्या विमानांच्या उड्डाणांवर बंदी घातली आहे. “रशियाने ब्रिटिश विमान कंपन्यांना त्यांच्या विमानतळांवर उतरण्यास किंवा त्यांचे हवाई क्षेत्र पार करण्यास बंदी घातली आहे,” रॉयटर्स वृत्तसंस्थेने शुक्रवारी रशियन राज्य नागरी विमान वाहतूक नियामकाचा हवाला देत याबाबत वृत्त दिले.
रशियाने हा निर्णय अशा वेळी घेतला आहे जेव्हा रशियाने युक्रेनवर केलेल्या हमल्यानंतर ब्रिटनने विविध निर्बंधांची घोषणा केली आहे. युक्रेनवरील आक्रमणामुळे रशियावर नवीन निर्बंधांची रूपरेषा सांगताना, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी गुरुवारी घोषणा केली की ते देशातील एयरोफ्लोट विमान कंपनीवर बंदी टाकणार आहेत.
ब्रिटिश संसदेत रशियाच्या विरोधात सादर करण्यात आलेल्या आर्थिक निर्बंधांच्या “सर्वात मोठ्या आणि कठोर पॅकेजमध्ये” रशियन-मालकीच्या बँकेची संपूर्ण मालमत्ता गोठवणे आणि ब्रिटेनला रशियन बँकांना देशाच्या आर्थिक व्यवस्थेतून बाहेर काढण्याची परवानगी देणे समाविष्ट आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी 5 रशियन बँकांवर निर्बंध टाकणार असल्याची घोषणा केली आहे. जॉन्सन म्हणाले, की “या व्यापार निर्बंधांमुळे रशियाच्या लष्करी, औद्योगिक आणि तांत्रिक क्षमतेला पुढील काही वर्षे अडचणी निर्माण होणार आहेत.
UNSC मध्ये येणार रशिया विरोधात ठराव..! रशियाने मागितलीय भारताकडे मदत; पहा, काय आहे नेमका प्रकार..?