युद्धाच्या संकटात युक्रेनने थेट भारताकडेच मागितलीय मदत.. पहा, काय आवाहन केलेय युक्रेनने
दिल्ली : रशियाने अखेर युक्रेनवर लष्करी आक्रमण केले आहे. आज सकाळपासूनच जोरदार युद्धाला सुरुवात झाली आहे. रशियाने युक्रेनच्या 11 शहरांवर हमला केला आहे. या आक्रमणाने जगभरात एकच खळबळ उडाली आहे. युक्रेनचे सातत्याने समर्थन करणाऱ्या अमेरिका आणि युरोपीय देशांना जोरदार झटका बसला आहे. युक्रेनच्या मदतीसाठी आता हे देश काय करतात, हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र, दुसरीकडे युक्रेनने थेट भारताकडे मदत मागितली आहे.
युक्रेनचे नवी दिल्लीतील राजदूत इगोर पोलिखा यांनी मोठे विधान केले आहे. भारत आणि रशियाचे विशेष संबंध असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अशा परिस्थितीत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी भारत अधिक चांगल्या पद्धतीने परिस्थिती हाताळू शकतो. पोलिखा यांनी म्हटले आहे की, आम्ही भारताच्या पंतप्रधानांना आवाहन करतो, की त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना लवकरात लवकर आमचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्याबरोबर संपर्क साधण्याचे आवाहन करावे.
युक्रेन-रशिया वादावर (Ukraine-Russia Conflict) भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत या समस्येवर शांततापूर्ण तोडगा काढणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. राजनैतिक उपाय ही काळाची गरज असल्याचे भारताने म्हटले आहे. भारताने या प्रकरणी दोन्ही देशांच्या संपर्कात असून युक्रेनमधील 20 हजारांहून अधिक भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढणे ही त्यांची प्राथमिकता असल्याचे सांगितले.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीसाठी भारताचे स्थायी प्रतिनिधी टीएस तिरुमूर्ती यांनी सांगितले की, आम्ही तणाव कमी करण्यासाठी ठोस उपाय शोधण्याच्या दिशेने काम करत आहोत. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेसाठी शांततापूर्ण आणि राजनयिक उपाय ही काळाची गरज आहे. हा प्रश्न राजनैतिक वाटाघाटीतूनच सोडला जाऊ शकतो. भारत असा उपाय शोधत आहे जो सर्व देशांच्या कायदेशीर सुरक्षेच्या हिताची काळजी घेईल आणि तणाव कमी करेल.
रशिया-युक्रेनमध्ये युद्धाची ठिणगी.. भारतीय शेअर बाजारावर झाला असा परिणाम..