दिल्ली : आता जागतिक राजकारणात रशियाचा मित्र म्हणून ओळखला जाणाऱ्या चीनने युक्रेन संकटावर मत व्यक्त केले आहे. चीनने युक्रेनच्या दोन फुटीरतावादी प्रदेशांच्या स्वातंत्र्याला मान्यता देण्याच्या रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या हालचालींवरून झालेल्या वादावर तसेच नवीन कारवाईवर राजनैतिक मौन पाळत संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. अमेरिका, युरोपियन युनियन आणि त्यांचे मित्र देश रशियाच्या विरोधातील संघर्षात युक्रेनला जोरदार पाठिंबा देत आहेत. पण चीनने वेगळी भूमिका घेतली आणि म्हटले की, रशियाच्या कायदेशीर सुरक्षेचा आदर केला पाहिजे. पण युक्रेनच्या दोन फुटीरतावादी प्रदेशांच्या स्वातंत्र्याला मान्यता देण्याच्या पुतिनच्या हालचालींबद्दलच्या प्रश्नांना उत्तर देणे मात्र त्यांनी टाळले.
मंगळवारी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात झालेल्या दूरध्वनी संभाषणात युक्रेनचा मुद्दा ठळकपणे समोर आला. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, ब्लिंकेन यांनी युक्रेनमधील सद्यस्थितीबद्दल अमेरिकेचे मत आणि स्थितीबद्दल वांग यांना माहिती दिली, तर वांग म्हणाले की चीन युक्रेनमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
पुतिन यांच्या या हालचालीचा संदर्भ देत वांग म्हणाले की, चीन या मुद्द्यावर अवलंबून सर्व पक्षांना सहभागी करून घेईल. याबरोबरच युक्रेनमधील परिस्थिती बिकट होत असल्याचे त्यांनी सांगितले. चीनने पुन्हा एकदा सर्व बाजूंना संयम बाळगण्याचे, तणाव कमी करण्याचे आणि संवादाद्वारे मतभेद सोडवण्याचे आवाहन केले आहे. या मुद्द्यावर यापेक्षा जास्त भाष्य करणे चीनने टाळले आहे.
दरम्यान, रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षाने संपूर्ण जगाला हादरून सोडले आहे. एकीकडे अमेरिकेसह सर्व नाटो देशांनी रशियाच्या आक्रमक कृतीचा निषेध केला आहे, तर दुसरीकडे भारत आणि चीनसारख्या मोठ्या राष्ट्रांनी या संपूर्ण वादावर तटस्थ धोरण घेतले आहे. या तणावासाठी रशियाने अमेरिका आणि मित्र राष्ट्रांना जबाबदार धरले आहे. युनायटेड नेशन्समधील एका रशियन राजनयिकाने सांगितले की, अमेरिका आणि त्याचे पाश्चात्य सहकारी युक्रेनला लष्करी कारवाई करण्यासाठी चिथावणी देत आहेत. सोमवारी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत रशियन राजनैतिक अधिकारी यांनी युक्रेनच्या काही भागात बॉम्ब टाकल्याचा आरोप केला होता.
.. म्हणून भारत आणि चीन आलेत एकाच गटात..! जपानने मात्र रशियाला दिलीय धमकी..