दिल्ली : रशियाचे भारतातील नवे राजदूत डेनिस एलीपोव्ह यांनी म्हटले आहे, की लद्दाखच्या मुद्द्यावर भारत आणि चीनमध्ये मध्यस्थी करण्याची रशियाची कोणतीही योजना नाही. मात्र, दोन्ही देशांनी मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली, तर रशिया त्यावर विचार करू शकतो, असे त्यांनी म्हटले आहे.
रशियन स्टेट न्यूज एजन्सी स्पुतनिकला त्यांनी सांगितले, की भारत आणि चीनमध्ये मध्यस्थ बनण्याची आमची कोणतीही योजना नाही. परंतु जर अशी इच्छा दोन्ही पक्षांनी व्यक्त केली असेल, तर नक्कीच, आम्ही त्याचा सर्वात काळजीपूर्वक विचार करू. एलीपोव्ह म्हणाले, की दोन्ही बाजू आपापसातील प्रादेशिक विवाद पूर्णपणे द्विपक्षीय मुद्दा मानतात, त्यामुळे मध्यस्थीचा काही अर्थ नाही. आम्ही हस्तक्षेप करणार नाही. आम्हाला आशा आहे की दोन्ही बाजू लवकरात लवकर राजनैतिक मार्गाने हा प्रश्न सोडवतील.
पूर्व लद्दाख भागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीन यांच्यात जवळपास दोन वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. आतापर्यंत दोन्ही देशांमध्ये चर्चेच्या 14 फेऱ्या झाल्या आहेत, मात्र अद्याप कोणताही निष्कर्ष निघू शकलेला नाही. मात्र, चर्चेनंतर अनेक मुद्द्यांवरून मतभेद निर्माण झाले आहेत. सैनिकी चर्चेच्या 14 फेऱ्यांपैकी दोन्ही बाजूंनी लवकरात लवकर कमांडर स्तरावरील बैठक घेण्याचे मान्य केले होते.
तसे पाहिले तर सध्या जागतिक राजकारण बदलले आहे. युक्रेनमुळे अमेरिका आणि रशिया यांच्यात तणाव वाढला आहे. अमेरिकेचा शत्रू म्हणून या मुद्द्यावर चीननेही रशियाला पाठिंबा दिला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रत्येक वेळी चीन रशियाची पाठराखण करत आहे. असे असताना भारत आणि अमेरिकेत सहकार्य वाढत आहे. त्याचाही परिणाम भारत आणि रशिया मैत्रीवर होण्याची शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करत असतात. इतकेच नाही तर रशियाने भारताचा सर्वात मोठा शत्रू पाकिस्तानबाबतही सहकार्याचे धोरण ठेवले आहे. या देशातील प्रकल्पात गुंतवणूक करणार असल्याचेही रशियाने म्हटले होते. आता तर पाकिस्तानचे पंतप्रधान पुढील महिन्यात रशिया दौऱ्यावर जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अशा पद्धतीने जागतिक राजकारण बदलत चालले आहे.
राजकारण फिरले..! अमेरिकेविरोधात चीन-रशिया आले एकत्र; ‘त्या’ मुद्द्यावर अमेरिकेला दिलीय धमकी..