चिन्यांच्या दादागिरीचा होणार बंदोबस्त..! आता ‘हा’ देशही फ्रान्सकडून घेणार राफेल; पहा, किती विमानांची दिलीय ऑर्डर ?
दिल्ली : इंडोनेशिया फ्रान्सकडून 42 राफेल विमाने खरेदी करणार आहे. फ्रान्सचे संरक्षण मंत्री फ्लोरेन्स पार्ली यांनी त्यांच्या ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. इंडो-पॅसिफिक प्रदेशात राफेलसारखी अत्याधुनिक लढाऊ विमाने असणारा इंडोनेशिया हा भारतानंतरचा दुसरा देश असेल. इंडोनेशिया आणि फ्रान्स यांच्यातील संरक्षण संबंध मजबूत झाल्यामुळे आमच्या धोरणात्मक भागीदारीला फायदा होईल, असे फ्लोरेन्सने म्हटले आहे. इंडोनेशिया फ्रान्सला पाणबुडीच्या क्षेत्रात सहकार्य करत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. मात्र, त्यांनी याबाबत कोणतीही माहिती दिली नाही.
दक्षिणपूर्वेतील आणखी एक देश असलेल्या फिलीपिन्सने नुकतीच भारताकडून ब्रह्मोस क्षेपणास्त्रे खरेदी करण्यास मान्यता दिली आहे. ब्राह्मोस क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करणारा फिलिपिन्स हा पहिला देश आहे. 28 जानेवारी 2022 रोजी दोन्ही बाजूंनी ब्रह्मोस करारावर स्वाक्षरी केली.
दक्षिण चीन समुद्रात चीनच्या वाढत्या दादागिरीमुळे इंडोनेशिया आणि फिलीपिन्ससह दक्षिण पूर्व आशियाई देश हैराण झाले आहेत. अलीकडे दक्षिण पूर्व आशियाई देशांनी चीनला प्रत्युत्तर देण्याचे ठरवले आहे. फिलीपिन्स, व्हिएतनाम, मलेशिया, ब्रुनेई आणि इंडोनेशिया या 5 देशांनी मिळून युती करणार असल्याचे म्हटले आहे. दक्षिण चीन समुद्रात आक्रमक चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी ही आघाडी आहे. अशा स्थितीत फिलिपाइन्ससारखे देश ब्रह्मोससारख्या क्षेपणास्त्राने अधिक मजबूत होतील आणि इंडोनेशियासारखे देश राफेलसारख्या लढाऊ विमानांमुळे आधिक शक्तिशाली होतील.
दरम्यान, चीनच्या कारवायांनी जगातील अनेक देश हैराण झाले आहेत. चीन आता अमेरिकेसाठीही धोकादायक ठरू लागला आहे. अमेरिकेप्रमाणेच युरोपातील देशांतही चीनविरोधात नाराजी वाढत चालली आहे. इतकेच नाही तर येथील काही देशांनी थेट जागतिक व्यापार संघटनेकडेच चीनविरोधात तक्रार दाखल केली आहे. तरी देखील चीनच्या स्वभावात काहीच फरक पडलेला नाही.
चीनचा त्रास वाढतच चालला आहे. चीनचा वाढता आक्रमकपणा पाहता आता जगातील देशांनी एकत्र येण्याचे ठरवले आहे. आघाडी करुन चीनच्या दादागिरीचा बंदोबस्त करण्याचा या देशांचा प्रयत्न राहणार आहे. तसेच चीनला जशास तसे उत्तर देण्याची वेळ आलीच तर आधुनिक सैन्य उपकरणेही या देशांकडून खरेदी केली जात आहेत.