मुंबई – श्रीलंकेचा माजी कसोटी कर्णधार सुरंगा लकमल (Suranga Lakmal) भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर निवृत्त होणार आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने (Sri Lanka Cricket Board) एक निवेदन जारी करून याबाबत माहिती दिली. लकमलने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर काउंटी लीगच्या डर्बीशायरसोबत 2 वर्षांचा करारही केला आहे. लकमलने 2009 मध्ये नागपुरात भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. एका वर्षानंतर, त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले.
पहिली कसोटी ४ मार्चपासून
श्रीलंकेचा संघ फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. संघाला प्रथम भारतासोबत 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. त्यानंतर 2 कसोटी सामन्यांची मालिकाही खेळवली जाणार आहे. पहिला T20 सामना 24 फेब्रुवारीला लखनौमध्ये खेळवला जाणार आहे. दुसरा T20 सामना 26 फेब्रुवारीला आणि तिसरा T20 सामना 27 फेब्रुवारीला धर्मशाला येथे होणार आहे. तर पहिला कसोटी सामना 4 ते 8 मार्च दरम्यान मोहालीत खेळवला जाणार आहे. त्याचवेळी, दुसरी कसोटी 12 ते 16 मार्च दरम्यान बंगळुरूमध्ये खेळवली जाणार आहे.
लकमलने श्रीलंकेसाठी 68 कसोटी सामन्यांच्या 119 डावांमध्ये 36.2 च्या सरासरीने 168 बळी घेतले आहेत. क्रिकेटच्या प्रदीर्घ फॉरमॅटमध्ये त्याने 7 विकेट्स आणि 4 वेळा 5 विकेट्स घेणाऱ्या क्लबमध्ये सहभाग घेतला आहे. 86 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 32.4 च्या सरासरीने 109 विकेट घेतल्या आहे तर 11 टी-20 सामन्यात 8 विकेट घेतल्या आहेत.