मुंबई : युक्रेनच्या मुद्द्यावर रशिया आणि अमेरिका यांच्यात तणाव वाढत आहे. या दरम्यान चीनने रशियाला पाठिंबा दिला आहे. नाटोचा विस्तार थांबवण्यात यावा, अशी मागणी चीन आणि रशियाने केली आहे. याबरोबरच रशियाने म्हटले आहे, की ते तैवानबाबत चीनच्या भूमिकेचे पूर्ण समर्थन करतो आणि तैवानच्या स्वातंत्र्याला कोणत्याही स्वरूपात विरोध करतो. 4 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या बीजिंग हिवाळी ऑलिम्पिकमध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन देखील पोहोचले आहेत, जिथे दोन्ही देशांनी एक संयुक्त निवेदन जारी केले आहे.
संयुक्त निवेदनात म्हटले आहे, की युरोपमध्ये कायदेशीर बंधनकारक सुरक्षा हमी तयार करण्याच्या रशियाच्या प्रस्तावांना चीन समर्थन देतो. रशिया आणि चीनने नवीन गॅस करारावरही स्वाक्षरी केली आहे. अशा परिस्थितीत अमेरिका आणि पाश्चात्य देशांबरोबरच्या तणावा दरम्यान रशिया आणि चीन आपले संबंध अधिक दृढ करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
रशिया आणि चीनच्या संयुक्त निवेदनात अमेरिकेच्या क्षेपणास्त्रांवर चिंता व्यक्त केली गेली आणि अमेरिकेच्या नेतृत्वाखालील नाटोच्या आणखी विस्ताराला विरोध केला. रशियाने तैवानबद्दल म्हटले आहे की, रशिया एक चीन या तत्त्वावर विश्वास ठेवतो आणि तैवान हा चीनचा अविभाज्य भाग आहे. रशिया तैवानच्या कोणत्याही स्वरूपाच्या स्वातंत्र्याला विरोध करतो.
युक्रेनच्या संदर्भात, रशियाने अमेरिकेच्या नेतृत्वाखालील नाटोकडे मागणी केली की रशियाच्या जवळचे देश जोडले जाऊ नयेत आणि नवीन नाटो सदस्यांच्या समावेशावर बंदी घालावी. रशियाचे प्रमुख प्रस्ताव अमेरिकेने फेटाळले आहेत. मात्र, शस्त्रास्त्र नियंत्रणासारख्या मुद्द्यांवर रशियाशी चर्चा करण्यास तयार असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यास आम्ही रशियावर याआधी कधीही न पाहिलेले असे कठोर निर्बंध लादू, असे सांगत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी पाश्चिमात्य देशांना रशियाविरुद्ध एकत्र करण्याचा प्रयत्न केला आहे.
अमेरिका-रशियाच्या वादात चीनने घेतलीय एन्ट्री; ‘त्या’ मुद्द्यावर अमेरिकेला दिलाय गंभीर इशारा