मुंबई – इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर (jofra Archer) ने आयपीएलच्या 15व्या मोसमासाठी होणाऱ्या मेगा लिलावासाठी सुरुवातीला आपले नाव दिले नव्हते. त्याचा 1 हजार 214 खेळाडूंच्या पहिल्या यादीत नाव नव्हते. त्याने लिलावापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता मात्र आता त्याने यू-टर्न घेतला असून 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी होणाऱ्य मेगा लिलावासाठी आपले नाव टाकले आहे.
तर दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी वेगवान गोलंदाज काईल जेमिसन (Kyle Jamieson) यावेळी आयपीएल खेळणार नाही. 1 हजार 214 पैकी 590 खेळाडूंची निवड केल्यानंतर बीसीआयने मंगळवारी 1 फेब्रुवारी रोजी नवीन यादी जाहीर केली आहे. त्यात आर्चरचे नाव पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्याने त्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये ठेवली आहे. आर्चरला यंदाच्या आयपीएलमध्ये खेळणे कठीण असल्याचे बीसीसीआयने आयपीएल फ्रँचायझीला सांगितले आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट (ECB) ने बीसीसीआयला 2023 आणि 2024 च्या हंगामात खेळणार असल्याची माहिती दिल्यामुळे त्याचे नाव लिलावात जोडले गेले आहे.
जेमिसनला आरसीबीने 15 कोटी रुपयांना विकत घेतले होते. 2021 च्या लिलावात जेमसनला विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 15 कोटी रुपयांना विकत घेतले होते. त्याने मागच्या हंगामात नऊ सामन्यांत नऊ विकेट घेतले होते. न्यूझीलंडचा हा स्टार कसोटी गोलंदाज यावेळी आयपीएलमध्ये दिसणार नाही.
आर्चर प्रकरणावर बीसीसीआय काय म्हणाले?
बीसीसीआयने फ्रँचायझीला 44 नवीन खेळाडूंची यादी देताना लिहिले की, “2023 आणि 2024 मध्ये संभाव्य सहभाग लक्षात घेऊन ईसीबीने आर्चरचे नाव पाठवले आहे. दुखापतीमुळे तो आयपीएल 2022 मध्ये सहभागी होण्याची शक्यता नाही.” फ्रँचायझींच्या विनंतीवरून 44 नवीन नावे जोडण्यात आली आहेत.
लिलावासाठी उस्मान ख्वाजाच्या नावाचाही समावेश
BCCI ने संघांना देखील कळवले आहे की आर्चर हा जगातील आघाडीच्या वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे परंतु त्याची मर्यादित उपलब्धता लक्षात घेता मार्की खेळाडूंमध्ये त्याचा समावेश केला जाणार नाही. तसेच, 2022 च्या हंगामात त्याच्या बदलीसाठी कोणतीही परवानगी दिली जाणार नाही. आर्चरशिवाय ऑस्ट्रेलियाच्या उस्मान ख्वाजाचेही नाव लिलावासाठी पुढे आले आहे. यापूर्वी त्यांनी नोंदणी केली नव्हती. ख्वाजाने त्याची मूळ किंमत दीड कोटी रुपये ठेवली आहे.