मुंबई – रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजचे सामने यावर्षी चार प्रमुख शहरांमध्ये खेळवले जाणार आहे. या लीगच्या आयोजकांना फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात या स्पर्धेच्या दुसरा सीझन सुरू करायचा आहे. रोड सेफ्टी मालिकेतील सामने हैदराबाद, विशाखापट्टणम, लखनौ आणि इंदूर येथे खेळवले जाणार आहे. मात्र, उत्तर प्रदेशात 10 मार्चपर्यंत निवडणुका होणार आहेत.
अशा परिस्थितीत लखनौच्या मैदानावर 10 मार्चनंतरच या स्पर्धेचे सामने आयोजित केले जाणार आहे. ही स्पर्धा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होणार असून तिचा अंतिम सामना मार्चच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे.
या स्पर्धेची पहिली आवृत्ती 2021 मध्ये खेळली गेली होती. रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या पहिल्या आवृत्तीत भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिजच्या संघांनी भाग घेतला.
या स्पर्धेची पहिली आवृत्ती भारतीय संघाने जिंकली होती. गेल्या मोसमात इरफान पठाण, तेंडुलकर, युसूफ पठाण आणि युवराज सिंगसारखे दिग्गज भारतीय संघात होते. रायपूरमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. भारताव्यतिरिक्त श्रीलंकेचा संघ अंतिम फेरीत पोहोचला होता. मात्र अंतिम सामन्यात श्रीलंकेच्या संघाला 14 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. सचिनच्या नेतृत्वाखाली भारताने ही स्पर्धा जिंकली होती.
यावेळीही, प्रत्येक देशातील दिग्गजांनी रस्ता सुरक्षा मालिकेत भाग घेणे अपेक्षित आहे. मात्र, गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूंचा संघ या स्पर्धेत सहभागी झाला नव्हता. या वर्षी ऑस्ट्रेलियाचा संघही या मालिकेचा भाग बनला तर शेन वॉर्न आणि रिकी पाँटिंगसारखे दिग्गज पुन्हा एकदा मैदानात पाहायला मिळतील. याआधी ब्रायन लारा, चंद्रपाल, संगकारा असे दिग्गज या लीगमध्ये खेळले आहेत.