मुंबई – इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गन (Eoin Morgan) वेस्ट इंडिजविरुद्धच्या ( westindies) T20 मालिकेतून बाहेर झाला आहे. त्याच्या उजव्या पायाला दुखापत झाल्याने तो टी-20 मालिकेतील शेवटचे दोन सामने खेळू शकणार नाही. मॉर्गनच्या अनुपस्थितीत मोईन अली (Moeen Ali) इंग्लंडचे नेतृत्व करणार आहे .
इंग्लंड क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे की, मॉर्गन मालिकेतील शेवटचे दोन सामने खेळणार नाही. सराव सामन्यादरम्यान मॉर्गनला उजव्या पायाला दुखापत झाली. त्यानंतर तो तिसऱ्या सामन्यात खेळला नाही. आता तो मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांमध्ये खेळणार नाही.
इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की मॉर्गनला उजव्या मांडीच्या स्नायूमध्ये समस्या आहे. यामुळे वेस्ट इंडिज दौऱ्यात तो आता उर्वरित सामने खेळू शकणार नाही. मात्र, ही दुखापत फारशी गंभीर नाही.
पाच सामन्यांच्या T20 मालिकेत इंग्लंड 2-1 ने पिछाडीवर आहे. या मालिकेतील पहिला सामना वेस्ट इंडिजने नऊ विकेट्सने जिंकला होता, तर दुसरा सामना इंग्लंडने एका धावेने जिंकला होता. तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजने 20 धावांने विजय मिळवला होता. या मालिकेतील चौथा सामना शनिवारी तर शेवटचा सामना रविवारी बार्बाडोस येथे खेळवला जाणार आहे. या दौऱ्यात इंग्लंड संघाला तीन कसोटी सामने देखील खेळायचे आहेत.
या मालिकेतील पहिल्या सामन्यात मोईन अलीला खेळण्याची संधी मिळाली नाही, मात्र दुसऱ्या सामन्यात त्याने अप्रतिम कामगिरी केली. अलीने बॅटने 31 धावा केल्या आणि गोलंदाजीत 24 धावांत तीन विकेट घेतले. या कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले. मात्र, कर्णधार झाल्यानंतर तिसऱ्या सामन्यात त्याला फार काही करता आले नाही. त्याने फक्त एक षटक टाकले आणि 14 धावा दिल्या. फलंदाजी करताना त्याला खातेही उघडता आले नाही.