.. म्हणून प्रत्येकाचेच लसीकरण गरजेचे..! पहा, नेमका काय इशारा दिलाय संयुक्त राष्ट्र प्रमुखांनी
दिल्ली : जगात काही देश असेही आहेत की ज्यांना अजूनही कोरोना प्रतिबंधक लसी मिळालेल्या नाहीत. आणि काही देशात तर या लसींचे प्रचंड नुकसान होत आहे. आफ्रिकेतील बहुतांश देशांना लसी मिळालेल्या नाहीत. काही देशांना मिळाल्या पण त्या खूप कमी संख्येने. तर काही देशांना लसी मिळत असतानाही त्यांनी या लसी घेण्यास नकार दिला आहे. विशेष म्हणजे, या देशातील बहुतांश लोकांचे लसीकरण झालेले नाही. काही देशात अशी परिस्थिती आहे. तर दुसरीकडे श्रीमंत देशांत वेगाने लसीकरण सुरू आहे. ओमिक्रॉनचा वाढता धोका पाहता काही देशात लसींचे बूस्टर डोसही सुरू केले गेले आहेत.
लसीकरणाची अशी परिस्थिती असताना आता या लसीकरणाबाबत संयुक्त राष्ट्रांचे महासचिव एंटोनियो गुटेरेस यांनी महत्वाचे विधान केले आहे. ते म्हणाले, की कोरोना संकटामुळे जागतिक अर्थव्यवस्था अजूनही पूर्वपदावर आलेली नाही. कोरोनाच्या संकटाचा सामना समानता आणि निष्पक्षतेसह केला पाहिजे. जोपर्यंत आपण जगातील प्रत्येक व्यक्तीचे लसीकरण करण्यात यश मिळवणार नाही, तोपर्यंत कोरोनाचे नवे व्हेरिएंट येत राहतील आणि हे व्हेरिएंट अर्थव्यवस्था ठप्प करत राहतील.
ज्यावेळी जगातील गरीब देशांना मदतीची सर्वाधिक गरज होती, त्यावेळी या देशांची मदत करण्यात जागतिक आर्थिक प्रणालीस अपयश आले. या संकटातून जग सावरत आहे मात्र, आधिक सक्षमतेने हे होत नाही. काही देशात लसीकरणाचा दर आफ्रिकी देशांच्या तुलनेत सात पट जास्त आहे. सध्याच्या काळात कमी उत्पन्न गटातील देश सर्वाधिक कमजोर आहेत. त्यात आता खाद्यपदार्थांची महागाई वाढल्याने या देशांसमोरील अडचणी आधिक वाढल्या आहेत.
दरम्यान, युनिसेफने काही दिवसांपूर्वी सांगितले, की जगात 30 पेक्षा जास्त देश असे आहेत की जे कोरोना लसी परत करत आहेत. मागील महिन्यात जगातील गरीब देशांनी दहा कोटींपेक्षा जास्त लसी घेण्यास नकार दिला. जगातील लहान आणि गरीब देशांना कोरोना प्रतिबंधक लसी देण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने एक अभियान सुरू केले आहे. या अभियानाचे नाव ‘COVAX’ आहे. या अभियानांतर्गत लहान आणि गरीब देशांना मोफत लसी देण्यात येत आहेत. या अभियानांतर्गत 150 देशांना कोरोना लसी दिल्या जात आहेत.
मात्र, यातील काही देश आता लस घेण्यास तयार नाहीत. न्यूज एजन्सीनुसार, युनिसेफचे पुरवठा विभागाचे निदेशक एत्लेवा कैडिली यांनी सांगितले, की गरीब देशांनी डिसेंबर महिन्यात 10 कोटींपेक्षा जास्त लसी माघारी पाठवल्या आहेत. लसींसाठी शेल्फ लाइन कमी असल्याने या देशांनी लसी माघारी पाठवल्या आहेत. या देशांकडे लस साठवणूक करण्यासाठी फ्रीज सुद्धा नाहीत. त्यामुळे या देशांना लस साठवणूक करणे शक्य नाही. आतापर्यंत किती लसी परत पाठवल्या आहेत, याबाबत मात्र त्यांनी माहिती दिली नाही.