नवी दिल्ली : कोरोनाच्या ओमिक्रॉन प्रकारामुळे अमेरिकेत कोरोनाचे रुग्ण प्रचंड वाढले आहेत. एका दिवसात 10 लाखांहून अधिक रुग्ण आढळले असून सध्या कोरोनाचे दीड लाखांहून अधिक रुग्ण दवाखान्यात दाखल आहेत. येत्या आठवड्यात रूग्णांची संख्या आणखी वाढणार असल्याचा इशारा तज्ज्ञांन दिला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस अमेरिकेसाठी कठीण राहणार आहेत.
सध्या अमेरिकेतील रुग्णालयांमध्ये दीड लाखांहून अधिक रुग्ण आहेत, जी आतापर्यंत सर्वाधिक संख्या आहे. रुग्ण अजून वाढतील. रुग्णांची संख्या वाढत असून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी होत आहे. रुग्णालयांना दुहेरी त्रास सहन करावा लागत आहे. रशियामध्येही ओमिक्रॉनमुळे रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या 24 तासांत 30,726 नवीन रुग्ण आढळले आहेत, तर आठवडाभराआधीपर्यंत दररोज सुमारे 15 हजार रुग्ण आढळत होते. या दरम्यान 670 जणांचा मृत्यू झाला आहे.
चीनने कोरोना विषाणू, विशेषत: ओमिक्रॉन विरुद्ध शून्य सहनशीलतेचे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे त्याची अर्थव्यवस्था आणि पुरवठा साखळीवर विपरीत परिणाम होत आहे. 2022 सालासाठी चीनचा अंदाजित आर्थिक विकास दर 4.8 टक्क्यांवरून 4.3 टक्क्यांवर राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण जवळपास निम्मे आहे. मॉर्गन स्टॅन्लेनेही वाढीचा अंदाज 4.9 टक्क्यांवरून 4.2 टक्के कमी केला.
अमेरिकन फार्मास्युटिकल कंपनी फायजरचे सीईओनी सांगितले की, कंपनी पुढील 5 वर्षांत फ्रान्समध्ये मोठी गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे. फ्रान्समध्ये कोरोनाविरोधी औषध बनवण्यासाठी फायजर स्थानिक कंपनीबरोबर भागीदारी करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
ग्रीसमध्ये, 60 वर्षांवरील सर्व लोकांसाठी लसीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. या वयोगटातील लसीकरण केलेल्या लोकांची सरासरी संख्या ग्रीसमध्ये युरोपियन युनियनच्या तुलनेत कमी आहे. सरकारचे म्हणणे आहे, की या वयोगटातील ज्या लोकांना लसीकरण केले जात नाही त्यांना जानेवारीमध्ये 57 डॉलर भरावे लागतील. यानंतरही लस न मिळाल्यास पुढील महिन्यापासून 114 डॉलर द्यावे लागतील.
.. आणि तरीही चीनने केलाय ‘तो’ मोठा कारनामा; कोरोनाचाही काहीच फरक पडला नाही; जाणून घ्या..