नवी दिल्ली : तैवानला पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावर चीन नेहमीच आक्रमक असतो. कोणताही देश असो त्याने जर तैवानच्या बाबतीत समर्थन केले तर चीनचा तिळपापड होतो. आताही चीनने या मुद्द्यावर युरोपातील एका देशास धमकी दिली आहे. चीन अमेरिकेला ज्या प्रकारे धमक्या देत असतो त्याच पद्धतीने आता जर्मनीली धमकी दिली आहे.
जर्मन दूतावासात तैनात चीनचे राजनयिक वेंग वेइडोंग यांनी रविवारी सांगितले, की आम्ही तैवानला पाठिंबा देणाऱ्या देशांवर लक्ष ठेवून आहोत. तैवानच्या स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या किंवा समर्थन करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत मदत करू नये. चीन आणि जर्मनीचे संबंध खूप चांगले आहेत. आम्हाला त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा तणाव नको आहे. जर्मन सरकारही लिथुआनियाला पाठिंबा देत आहे. आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की चीन अशी कृत्ये करणाऱ्या देशांवर कठोर आर्थिक निर्बंध लादू शकतो. यामुळे जर्मनीचे मोठे नुकसान होऊ शकते, असे चीनने म्हटले आहे.
जगात आपल्या सामर्थ्यात वाढ करण्याच्या प्रयत्नात असलेला मुजोर चीन अनेक देशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. चीनच्या कावेबाजपणाचा अनुभव अनेक देशांनी घेतला आहे. आपला स्वार्थ साधण्यासाठी मित्र देशांची फसवणूक करण्यासही चीन मागेपुढे पाहत नाही. अशा अनेक मार्गांनी त्रास देत असलेल्या चीन विरोधात आवाज उठू लागले आहेत. तैवानने तर चीनला थेट आव्हानच दिले आहे. अमेरिकेचा पाठिंबा असल्याने तैवान आता चीनच्या धमक्यांनाही घाबरत नाही, अशी परिस्थिती आहे.
विशेष म्हणजे, तैवानला आता जगभरातून पाठिंबा मिळत आहे. अमेरिकेचे समर्थन तर आहेच शिवाय आता दुसऱ्या देशांचाही पाठिंबा मिळत आहे. चीन तैवानला स्वतंत्र देश मानत नसला तरी जगात असेही काही देश आहेत की ज्यांनी तैवानचे सार्वभौमत्व मान्य केले आहे. या प्रकारांमुळे चीनची डोकेदुखी वाढणार मात्र आहे. जगातील कोणते देश आज तैवानला समर्थन देत आहेत, याची यादी सातत्याने वाढत चालली आहे.
सध्या तरी काही देश आहेत ज्यांचा तैवानला पाठिंबा आहे. भविष्यात या देशांना चीनचा त्रासही सहन करावा लागू शकतो. मात्र तरीही या देशांनी तैवानला पाठिंबा दिला आहे. ग्वाटेमालाने 1933 मध्ये तैवानच्या सार्वभौमत्वाला मान्यता दिली. होंडुरास या देशाचे काही खरे नाही, सध्या हा देश तैवानला समर्थन देत आहे. पण, येथे नुकत्याच झालेल्या निवडणुकीत चीनच्या विचारांचे सरकार सत्तेत आले आहेत. त्यामुळे भविष्यात हा देश तैवानला दिलेले समर्थन मागे घेण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. या व्यतिरिक्त आणखीही काही देश आहेत, ज्यांनी तैवानला समर्थन दिले आहे. मात्र, या देशांना धमक्या देण्यापलीकडे चीन सध्या तरी काही करू शकत नाही.
अर्र.. फक्त अमेरिकाच नाही तर ‘हे’ देशही करतात तैवानचे समर्थन; चीनच्या डोकेदुखीत वाढ