बाब्बो… पेंडोरा पेपर्सच्या यादीत नावे आलेल्या भारतीयांच्या नोंदींची होणार छाननी.. किती नावे आली या यादीत
नवी दिल्ली : पेंडोरा पेपर्समुळे जगभरातील श्रीमंत व्यक्तींनी जगभरातील वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या मार्गाने गुंतवलेल्या पैशांचे व्यवहार नुकतेच उघड झाले आहेत. यामुळे जगभर खळबळ उडाली आहे. यामध्ये अनेक देशातील मोठमोठ्या उद्योजक, राजकारणी यांचा समावेश आहे. यामुळे मोठी आर्थिक संपत्ती उघड झाली आहे. यातच काही भारतीयांची नावे आल्याने देशभरात चर्चा सुरु आहे.
विरोधी पक्षांनी या प्रकाराची चौकशी व्हावी अशी मागणी केंद्र सरकारकडे केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने सीबीडीटी अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखालील एका बहु-एजन्सी गटाची या प्रकाराच्या चौकशीसाठी नेमणूक केली.
या गटाने ज्या भारतीयांची नावे पेंडोरा पेपर्समध्ये आली आहेत. त्यांच्या नोंदींची चौकशी सुरू केली आहे. या गटाची पहिली बैठक नुकतीच झाली. अंमलबजावणी संचालनालय (ईडी), रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आणि आर्थिक युनिट (एफआययू) चे अधिकारी बैठकीला उपस्थित होते.
पेंडोरा पेपर्समध्ये 380 श्रीमंत भारतीयांची नावे आहेत. तथापि, यापैकी अनेक भारतीयांनी आम्ही काहीही चुकीचे केलेले नाही असे म्हटले आहे. इंटरनॅशनल कन्सोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव जर्नालिस्ट्सने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.
117 देशांतील 150 मीडिया संस्थांच्या 600 पत्रकारांच्या मदतीने हा अहवाल तयार करण्यात आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भारतातील बहु-एजन्सी गट या खुलाशांच्या आधारे तपास करत आहे.
बैठकीत उपस्थित एका अधिकाऱ्याने सांगितले की, आयसीआयजेचा हा अहवाल विचारात घेण्यात आला आहे आणि संबंधित तपास यंत्रणा या प्रकरणाची चौकशी करत आहेत. दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार योग्य ती कारवाई केली जाईल. इतर नावे उघड होताच आम्ही तपास अधिक तीव्र करू, असेही ते म्हणाले.