नवी दिल्ली : देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर कमी झाला आहे. मात्र, धोका अजूनही कायम आहे. केरळ राज्यात मोठ्या संख्यने रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने राज्यांना अलर्ट केले आहे. तर, दुसरीकडे देशभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण वेगाने होत आहे. भारतासारख्या अफाट लोकसंख्येच्या देशातील कोरोना लसीकरणाची नोंद जगाने घेतली आहे. देशातील लसीकरणाचा आकडा 75 कोटींच्याही पुढे गेला आहे. या कामगिरीचे जागतिक आरोग्य संघटनेनेही कौतुक केले आहे. केंद्र सरकारने लसीकरण अभियान वेगाने सुरू केले, त्यामुळे हा टप्पा पार करता आला आणि आरोग्य संघटनेनेही नोंद घेतली.
एएनआय वृत्तसंस्थेच्या एका रिपोर्टनुसार, भारताने वेगाने लसीकरण करत फक्त 13 दिवसात 10 कोटी लोकांचे लसीकरण केल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. आता अशी परिस्थिती आहे, की लसीकरणाबाबत भारत जगातील अन्य देशांच्या तुलनेत आघाडीवर आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 29 कोटी 92 लाख 22 हजार 651 लोकांना लसीचा पहिला डोस दिला आहे. 18 ते 44 वयोगटातील 4 कोटी 37 लाख 98 हजार 76 लोकांना लसीचा दुसरा डोस दिला आहे. 45 ते 59 वयोगटातील 14 कोटी 37 लाख 03 हजार 736 लोकांना पहिला डोस तर 6 कोटी 31 लाख 16 हजार 459 लोकांना दुसरा डोस दिला आहे.
दरम्यान, जगभरात सध्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण वेगाने सुरू आहे. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटमुळे पुन्हा रुग्णवाढ होत असल्याने देशांनी जास्तीत जास्त लसीकरण करण्यावर भर देण्यात आला आहे. अमेरिका, इस्त्रायल, चीन, ब्रिटन, रशिया, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, फ्रान्स या देशात वेगाने लसीकरण सुरू आहे. या विकसित देशांच्या तुलनेत लोकसंख्या जास्त असतानाही भारतात वेगाने लसीकरण होत आहे. देशात 75 कोटींपेक्षा जास्त लोकांना लस दिली आहे. केंद्र सरकारकडून राज्यांना मोफत लस देण्यात येत आहे. पुढील टप्प्यात राज्यांकडून लसीकरणाचे नियोजन करण्यात येऊन लोकांचे लसीकरण करण्यात येत आहे.
. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.