दिल्ली : आतापर्यंत कोरोनाच्या जितक्या व्हेरिएंटची माहिती मिळाली आहे, त्यामध्ये डेल्टा व्हेरिएंट सर्वाधिक संक्रामक आहे. कोरोना प्रतिबंधक लस न घेतलेल्या लोकांमध्ये हा व्हेरिएंट वेगाने फैलावत चालला आहे. सध्या कोरोनाचे रुग्ण कमी होत असल्याने काही देशांनी लॉकडाऊनचे निर्बंधांत सवलती दिल्या आहेत. त्यामुळेसुद्धा जगभरात कोरोना संक्रमण पुन्हा वाढत चालले आहे. सद्यस्थितीत अल्फा व्हेरिएंटची प्रकरणे 172 देशात आढळली आहेत. तसेच गामा व्हेरिएंट 72 आणि बीटा व्हेरिएंटची प्रकरणे 120 देशात आढळली आहेत. अशा परिस्थितीत काळजी घेण्याचे आवाहन पुन्हा एकदा जागतिक आरोग्य संघटनेने केले आहे.
कोरोनाचा प्रसार रोखायचा असेल तर सप्टेंबरपर्यंत प्रत्येक देशात किमान 10 टक्के तरी लसीकरण झाले पाहिजे, असे आवाहन डब्ल्यूएचओने केले आहे. जोपर्यंत जगातील प्रत्येक ठिकाणी महामारी नष्ट होणार नाही तोपर्यंत या महामारीचा पूर्णपणे नायनाट होणार नाही. जगात काही देश लसीकरणात खूप पुढे गेले आहेत तर काही देशात अजूनही कोरोना प्रतिबंधक लस मिळालेल्या नाहीत. कोरोनाने आता स्वतःचे रूप बदलत अधिक घातक होण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाच्या डेल्टा आणि डेल्टा प्लस या व्हेरिएंटने जगभरात थैमान घालण्यास सुरुवात केली आहे.
डेल्टा व्हेरिएंट अतिशय घातक असून जगभरातील 104 देशांमध्ये फैलावला आहे. आता हा कोरोनाचा नवा अवतार लवकरच अवघ्या जगात फैलावण्याची शक्यता आहे, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रोस घेब्रेयेसस यांनी दिला आहे. त्यांनी पुढे म्हटले, की मागील आठवड्यात सुद्धा जगभरात कोरोनाचे रुग्ण वाढत होते. मागील जवळपास 10 आठवड्यांपासून कोरोना प्रकरणे कमी होत असताना आता पुन्हा रुग्ण वाढ होणे काळजीत टाकणारे आहे. डेल्टा व्हेरिएंट जगभरात वेगाने फैलावत चालला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात हा घातक व्हेरिएंट अवघ्या जगास विळख्यात घेण्याची शक्यताही नाकारता येत नाही. कोरोना सातत्याने रुप बदलत असल्याने आधिकच घातक होत आहे.
दरम्यान, याआधी घेब्रेयेसस यांनी असा इशारा दिला होता, की जग कोविड 19 च्या महामारीच्या अत्यंत धोकादायक अवस्थेत आहे. डेल्टासारखे व्हेरिएंट आधिक संक्रामक असून बऱ्याच देशांमध्ये पसरत आहे. अद्याप कोणताही देश या संकटातून बाहेर आलेला नाही. कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट आधिक धोकादायक आहे, आणि काळानुसार तो आणखी बदलत आहे. त्यामुळे आपणास सतत देखरेख ठेवणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले होते. आजमितीस जगातील 104 देशांमध्ये हा व्हेरिएंट पसरला आहे. लसीकरण वेगाने न केल्यास यामुळे अवघे जग संकटात सापडू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.
- ‘त्या’ दुर्दैवी घटनेत फायर ब्लोअरचाही झाला होता स्फोट; मुख्यमंत्र्यांनीही घेतली दखल
- ज्वारी प्रक्रिया म्हणजे दुप्पट नफा कमावण्याची संधी; पहा यातील संधी आणि प्रोसेसिंग फूड