वॉशिंग्टन : जगभरात सध्या कोरोनाचे नवे व्हेरिएंट धुमाकूळ घालत आहेत. तसेच याआधी प्राण्यांमध्येसुद्धा कोरोनाचे संक्रमण आढळले होते. याचकाळात चीनमध्ये बर्ड फ्लूचा रुग्णही सापडला. तसेच प्राण्यांद्वारे कोरोना विषाणू माणसांत फैलावल्याचाही दावा केला जात आहे. या दाव्याबाबत अद्याप स्पष्टता नसतानाच आणखी एक संकट जगावर आलेले आहे. त्याने प्राणी आणि पक्षीदेखील संकटात सापडले आहेत.
अमेरिकेत एका रहस्यमयी आजाराने हजारो पक्ष्यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. अमेरिकेच्या पूर्व आणि दक्षिणेतील काही राज्यात तिलीयर, निलकंठ प्रजातींसह अन्य प्रकारचे हजारो पक्षी मृत्यूमुखी पडत आहेत. पक्ष्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजलेले नाही. त्यामुळेच वैज्ञानिक आता याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. वन्यजीव अधिकाऱ्यांना सर्वात आधी मे महिन्यात वॉशिंग्टन, व्हर्जिनिया आणि पश्चिम व्हर्जिनिया प्रांतात पक्षी आजारी आणि मृत्युमुखी पडत असल्याचे समजले होते. या पक्षांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आहे याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
तरी न्यू मेक्सिकोमध्ये पक्षांना पुरेशा प्रमाणात खाद्य मिळाले नसल्याने अनेक पक्षांचा मृत्यू झाला आहे, असे वैज्ञानिकांना वाटत आहे. हे पक्षी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात होते. या पक्षांच्या मृत्यूचे खरे कारण माहीत करून घेण्यासाठी पक्षांचे मृतदेह तपासणीसाठी पाठवण्यात येत आहे. ओहायो प्रांतात अनेक पक्षांच्या डोळ्यांना त्रास होत असल्याचे वन्यजीव सेंटरच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
आता मात्र या आजाराचा प्रादुर्भाव होण्याची धोका असल्याचाही इशारा देण्यात आला आहे. यूएसजीएसने सांगितले, की पक्ष्यांनी एकाच ठिकाणी गर्दी केल्यास या आजाराचा प्रसार होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी पक्ष्यांना खाद्य पदार्थ देऊ नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे. याआधी अमेरिकेच्या सीडीसीनेसुद्धा इशारा दिला होता की अन्य काही राज्यातसुद्धा पक्षांसंबंधी आजार फैलावले आहेत. यामध्ये आठ लोकांचा मृत्यू झाल्याचेही सांगण्यात येत आहे.
- मुंडेंच्या पक्षबदलाची चर्चा जोरात; आजच्या बैठकीत ठरणार दिशा..!
- नीरव मोदीच्या बहिणीने मोदी सरकारला पाठवले 17 कोटी रुपये..! ईडीची माहिती.. नेमका प्रकार जाणून घेण्यासाठी वाचा..