दिल्ली : अवघ्या जगास कोरोना महामारीच्या संकटात ढकलणाऱ्या चीनच्या अडचणी आता वाढत चालल्या आहेत. कोरोनाचे उत्पत्तीचे ठिकाण शोधून काढण्यासाठी पुन्हा तपासणी करण्याचे आदेश अमेरिकेने आधीच दिले आहेत. जगातील अन्य देशांनीही चीनच्या विरोधात भूमिका घेतली आहे. ब्रिटेनमधील जी ७ देशांच्या संमेलनातही चीनला घेरण्यासाठी खास रणनिती तयार करण्यात आली. त्यामुळे चीनवर दबाव वाढत चालला आहे. त्याचे परिणामही दिसून येत आहेत. आतापर्यंत चीनची पाठराखण करणाऱ्या जागतिक आरोग्य संघटनेनेगही आता चीनला स्पष्ट शब्दांत सुनावले आहे.
आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रोस घेब्रेयेसस यांनी कोरोनाच्या उत्पत्तीबाबत सध्या सुरू असलेल्या तपासणीत चीननेसुद्धा सहकार्य करावे, असे म्हटले आहे. त्यांनी पुढे असेही म्हटले, की पुढील टप्प्यात या तपासणीच्या कार्यवाहीत आधिक पारदर्शकता ठेवण्यात येईल. तपासणीचे कामकाज पूर्ण करण्यासाठी चीनच्या सहकार्याची आवश्यकता आहे. याआधी कोरोनाची उत्पत्ती चीनच्याच प्रयोगशाळेत झाल्याचा आरोप अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी अनेकदा केला होता. चीन आणि जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या तपासणीत असे काही दिसले नाही. आरोग्य संघटनेने तर असे म्हटले की हा विषाणू एखाद्या प्राण्यातून माणसांत फैलावला असावा, असे सांगितले होते.
या अहवालावर मात्र जगभरातून टीका करण्यात आली. ट्रंप यांनी तर थेट आरोग्य संघटनेवरच आगपाखड केली. संघटना या प्रकरणात चीनचे संरक्षण करत असल्याचा आरोप केला. त्यानंतर अनेक संशोधकांनी हा विषाणू प्रयोगशाळेतूनच लीक झाल्याचा दावा केला होता. काही दिवसांपूर्वी तर अमेरिकेच्या एका वृत्तपत्रात याबाबत असा अहवाल प्रसिद्ध झाला. ज्यामुळे जगभरात खळबळ उडाली. त्यामुळे हा विषाणू लॅबमधून लीक झाल्याच्या दाव्यास आधिक बळकटी मिळाली. या अहवालानंतर लगेच अध्यक्ष जो बायडेन यांनी गुप्तचर संस्थांना कोरोनाचे ठिकाण शोधण्याचा आदेश दिला. या घडामोडींनंतर आता आरोग्य संघटनेसही या प्रकरणी आधिक तपास करण्याची आवश्यकता असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे आता चीनला अडचणीचे ठरणारे धोरण या संघटनेने घेतल्याचे दिसत आहे.
- कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
- | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.