नवी दिल्ली : तालिबानी नेत्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर जोरदार टीका केली आहे. एका स्थानिक टीव्ही चॅनलला माहिती देताना तालिबान सरकारच्या प्रवक्त्याने पाकिस्तानवर अत्यंत कठोर शब्दांत टीका केली आहे. तसेच पाकिस्तानबाबत एक भविष्यवाणीही केली आहे. ज्याचा त्रास पाकिस्तानी राज्यकर्त्यांना निश्चित होणार आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान आयएसआय या गुप्तचर संस्थेच्या इशाऱ्यावर काम करत आहेत. पाकिस्तान सरकार राष्ट्रवादी अफगाण लोकांना तालिबान सरकार विरोधात भडकवण्याचा प्रयत्न करत आहे. हा त्यांचा एक उद्देश आहे. पाकिस्तानचे लवकरच विघटन होईल आणि हा देश लवकरच FATF च्या काळ्या यादीत असेल असेही प्रवक्त्याने सांगितले. सुरुवातीला पाकिस्तान आणि तालिबान यांच्यात मैत्री पाहायला मिळाली. पण आता दोघांमधील संबंध बिघडत चालल्याचे दिसून येत आहे. त्याच वेळी, पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा अधिकाऱ्यांना अफगाणिस्तानचा प्रस्तावित दौरा रद्द करावा लागला आहे.
अफगाणिस्तानात तालिबानी राजवट येऊन पाच महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. पण नॅशनल रेझिस्टन्स फोर्स (NRF) अजूनही तालिबानी सैनिकां विरोधात संघर्ष करत आहे. एनआरएफ अतिरेक्यांना सत्तेतून बाहेर करण्यासाठी कटिबद्ध आहे. NRF ने एक संदेश जारी केला आहे, जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये अफगाणिस्तानच्या जनतेला आवाहन करण्यात येत आहे की, त्यांनी गप्प बसू नये. एका वेगळ्या ऑडिओ संदेशात, NRF नेत्यांनी स्पष्ट केले, की त्यांचा संघर्ष कोणत्याही विशिष्ट गटासाठी नाही तर अफगाणिस्तानच्या संपूर्ण स्वातंत्र्यासाठी आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये तालिबानने सत्ता ताब्यात घेतल्यापासून अफगाणिस्तानमधील परिस्थिती अत्यंत खराब झाली आहे. या संकटात देशातील सर्वसामान्य नागरिकांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागला आहे. या संकटात देशात प्रचंड बेरोजगारी वाढली आहे. देशातील तब्बल 5 लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत. सध्याची बेरोजगारी अशीच चालू राहिल्यास 2022 च्या मध्यापर्यंत 9 लाख लोक नोकऱ्या गमावतील असा इशारा आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने दिला आहे.
देशातील आर्थिक संकट आणि प्रशासनातील बदल यामुळे बेरोजगारीत लक्षणीय वाढ झाल्याचे संघटनेने म्हटले आहे. बुधवारी जारी केलेल्या मूल्यांकन अहवालात, ILO ने देशातील वाढत्या बेरोजगारीबाबत इशारा दिला आहे. असे म्हटले आहे, की बेरोजगारीचा सध्याचा कल असाच सुरू राहिल्यास 2022 च्या मध्यापर्यंत सुमारे 9 लाख लोक त्यांच्या नोकऱ्या गमावतील, टोलो न्यूजने वृत्त दिले आहे. ILO च्या अहवालानुसार 2021 च्या तिसऱ्या तिमाहीत रोजगारामध्ये 16 टक्क्यांनी घट झाली आणि 2022 च्या मध्यापर्यंत ती 28 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
अरेरे.. तालिबान्यांच्या राजवटीत लाखो लोकांपुढे आलेय ‘हे’ संकट; पहा, काय सुरू आहे तालिबानी राज्यात