Pakistan News : दिवाळखोरीच्या मार्गावर असलेल्या पाकिस्तानला (Pakistan) त्याचा मित्र मलेशियाकडून मोठा धक्का बसला आहे. मलेशियाने पाकिस्तानच्या सरकारी विमान कंपनी पीआयएचे बोईंग ७७७ विमान जप्त केले आहे. पाकिस्तानी मीडियाच्या वृत्तानुसार, मलेशियाच्या क्वालालंपूर विमानतळावरील लीज वादात अनेक वेळा सांगूनही पैसे न दिल्याने पाकिस्तानचे हे विमान जप्त करण्यात आले आहे. पाकिस्तान मलेशियाशी मैत्रीचे सर्व दावे करत आहे. मात्र असे असतानाही मलेशियाने पाकिस्तानला जोरदार धक्का दिला आहे.
ARY च्या वृत्तानुसार, पाकिस्तानी विमान कंपनीने हे बोईंग 777 विमान मलेशियाकडून भाडेतत्त्वावर घेतले होते. क्वालालंपूर विमानतळावर हे विमान दुसऱ्यांदा जप्त करण्यात आले आहे. अनेकवेळा सांगूनही पाकिस्तानने मलेशियाला पैसे दिले नसल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर मलेशियाने पाकिस्तानी विमान कंपनीचे विमान ताब्यात घेतले आहे. पाकिस्तानला बोईंग विमानासाठी सुमारे 40 लाख डॉलर मलेशियाला देणे बाकी आहे.
मलेशियाच्या कंपनीने पाकिस्तानने पैसे न भरल्याबद्दल स्थानिक न्यायालयाकडून आदेश घेऊन विमानतळावरील पीआयएचे विमान जप्त केले. मलेशियामध्ये पाकिस्तानचा अपमान होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही 2021 मध्ये मलेशियाची राजधानी क्वालालंपूरमध्ये पाकिस्तानी विमान जप्त करण्यात आले होते. त्यावेळीही पाकिस्तानने पैसे दिले नव्हते. मात्र, नंतर पाकिस्तानचे पैसे देण्याचे राजनैतिक आश्वासन दिल्यानंतर मलेशियाने या विमानाला जाण्याची परवानगी दिली.
हे जप्त केलेले विमान कसेबसे परत आणता आले. विमानात 173 प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. पाकिस्तान सध्या परकीय चलनाच्या गंगाजळीच्या गंभीर संकटाला तोंड देत आहे. पाकिस्तानकडे परकीय चलनाचा साठा फक्त 4 अब्ज डॉलर्स इतकाच आहे. पाकिस्तान सध्या IMF कडे कर्जाची मागणी करत आहे पण अजून तशी शक्यता दिसत नाही. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी आता आयएमएफच्या व्यवस्थापकीय संचालकांना विनंती केली आहे.