नवी दिल्ली : युक्रेनच्या मुद्द्यावर अमेरिका आणि रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये जिनिव्हामध्ये महत्वाची बैठक होत आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री म्हणाले, की सुरक्षेची हमी देण्याचा आमचा प्रस्ताव अतिशय स्पष्ट आहे, आम्हाला त्याच प्रकारचे स्पष्ट उत्तर हवे आहे. युक्रेन सीमेवर रशियन सैन्य उभारणीवरून निर्माण झालेल्या तणावामुळे ही बैठक होत आहे. गुरुवारी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यास गंभीर परिणाम होतील, असा इशारा दिला होता.
आमचे मतभेद आज इथेच संपतील असे आम्हाल अपेक्षित नाही. मात्र आता आमच्यात संवादाचा मार्ग मोकळा झाला आहे आणि त्यावर वाटचाल करत आम्ही मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून मतभेद शांततेने सोडवू, असा विश्वास आहे, असे मत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकेन यांनी व्यक्त केले.
बेलारूस आणि क्रिमियाच्या सीमेवरून रशियन सैन्य युक्रेनवर आक्रमण करू शकते, असे पाश्चात्य देशांना वाटत आहे. अशा प्रकारे युक्रेनवर तीन बाजूंनी आक्रमण केले जाऊ शकतो, जे युक्रेनसाठी अत्यंत हानिकारक असेल. रशियाने युक्रेनवर आक्रमण करण्याची योजना नाकारली आहे, परंतु त्याच्या सुरक्षेला धोका असल्यास लष्करी कारवाई करण्यास स्वतंत्र असल्याचे म्हटले आहे. जिनिव्हा येथे आलेले रशियाचे उप परराष्ट्र मंत्री सर्गेई रायबेकोव्ह म्हणाले की, लष्करी कारवाई करताना रशिया कोणालाही घाबरणार नाही, अगदी अमेरिकेलाही नाही. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील लष्करी आघाडी नाटो (नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन) मध्ये युक्रेनचा समावेश करण्याच्या प्रयत्नाला रशिया विरोध करत आहे, हे विशेष.
युक्रेन नाटोमध्ये सामील झाल्याने अमेरिकेची क्षेपणास्त्रे आपल्या सीमेवर तैनात होतील, असे रशियाला वाटते. युक्रेन नाटोमध्ये सामील होणार नाही, असे स्पष्ट आश्वासन रशियाला हवे आहे. हे आश्वासन न मिळण्याच्या भीतीने रशियाने युक्रेनच्या सीमेवर सैन्य आणि शस्त्रे तैनात केली आहेत.