Jo Biden : अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीची (US Presidential Election) रणधुमाळी सुरू झाली आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Jo Biden) यांनी सोमवारी सांगितले, की ते 2024 च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरण्याचा विचार करत आहेत. पण अजून अधिकृत घोषणा करू शकत नाही.
एका मुलाखती दरम्यान बायडेन म्हणाले, डेमोक्रॅटिक पक्षाकडून पुन्हा उमेदवार व्हायचे आहे. उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनीही यंदा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एनबीसीच्या मते, व्हाईट हाऊसचे वरिष्ठ सल्लागार ‘बायडेन पुन्हा’ मोहीम चालवण्याच्या अंतिम तयारीत आहेत. या संदर्भात निर्णय घेण्यात आला असून, तो जाहीर करण्यासाठी दबाव येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
ट्रम्पही मैदानात
दुसरीकडे, माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) रिपब्लिकन पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढण्याची तयारी करत आहेत. त्यासाठी त्यांनी मोहीम सुरू केली आहे. पण त्यांना खटल्यांचीही भीती वाटते. सध्या ते त्यांच्या पक्षात प्रबळ दावेदार आहेत. तर पक्षातील त्यांचे प्रतिस्पर्धी त्यांच्या प्रकरणांवर लक्ष ठेवून आहेत.
ट्रम्प यांनी उमेदवारी जाहीर केली
यापूर्वी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या वर्षी १५ नोव्हेंबर रोजी निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली होती. ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ अशा घोषणा देत ट्रम्प यांनी दक्षिण कॅरोलिना या दक्षिणेकडील राज्यात रॅलीला संबोधित केले होते. त्यात त्यांनी विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यावर विक्रमी महागाई आणि मेक्सिकोतून दक्षिण सीमा पार करून घुसखोरांच्या मुद्द्यावरून टीका केली होती.
अफगाणिस्तानचा मुद्दा गाजणार
दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत अमेरिकेतून सैन्य माघारीचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. अफगाणिस्तानातून सैन्य माघारी का बोलावले याचा मोठा खुलासा बायडेन प्रशासनाने नुकताच केला आहे. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकात आरोप प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे.
जो बायडेन (Jo Biden) प्रशासनाने 2021 मध्ये युद्धग्रस्त अफगाणिस्तानातून (Afghanistan) अमेरिकन सैन्याच्या माघारीचा बचाव केला आहे. या देशातून अमेरिकन सैन्याने माघार घेतली नसती तर तालिबान्यांनी या सैन्यावर हल्ला केला असता असा धक्कादायक खुलासा प्रशासनाने केला आहे. याबरोबरच माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या कार्यकाळात झालेल्या करारामुळे बळजबरीने हे सर्व करावे लागल्याचा आरोप करण्यात आला.
वव्हाईट हाऊसने गुरुवारी जारी केलेल्या 12 पानांच्या दस्तऐवजात अफगाणिस्तानातून सैन्य माघारीच्या अटींची रूपरेषा देण्यात आली आहे. यासंबंधीची गोपनीय कागदपत्रे काँग्रेसच्या विविध समित्यांना पाठवण्यात आल्याचे सांगण्यात येते. अहवालात म्हटले आहे, की ट्रम्प प्रशासनाने अमेरिकन सैन्य मागे घेण्यासाठी तालिबानशी करार केला होता. तथापि, गुरुवारच्या अहवालात हा करार अंमलात आणण्याच्या नियोजनाच्या अभावासाठी तत्कालीन-ट्रम्प प्रशासनाला दोष देण्यात आला आहे.
28 सप्टेंबर 2021 रोजी संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांनी सांगितले होते की जर अमेरिकन सैन्याने माघार घेतली नाही तर तालिबान त्यांच्यावर हल्ला करू शकतात. व्हाईट हाऊसचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन किर्बी यांनी पत्रकारांना सांगितले की बायडेन प्रशासनाला त्यांच्या निर्णयाचा अभिमान आहे.
अहवालात असे म्हटले आहे, की 20 जानेवारी 2021 रोजी जो बायडेन यांनी अमेरिकेचे अध्यक्षपद स्वीकारले तेव्हा तालिबान 2001 पासूनच्या सर्वात मजबूत लष्करी स्थितीत होते. त्याने जवळपास अर्धा देश काबीज केला होता. त्यावेळी अफगाणिस्तानात फक्त 2,500 अमेरिकन सैन्य होते, जे 2001 नंतरचे सर्वात कमी संख्या होती.