Australia Bans Tik Tok : ऑस्ट्रेलियामध्येही सरकारी उपकरणांवर चीनी शॉर्ट व्हिडिओ अॅप टिकटॉक (Australia Bans Tik Tok) च्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. सुरक्षेचे कारण देत ऑस्ट्रेलियन सरकारने या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. आता कोणत्याही सरकारी कर्मचारी किंवा ऑस्ट्रेलियन खासदारांच्या फोन, कॉम्प्युटरवर चायनीज अॅप इन्स्टॉल होणार नाही.
यापूर्वी अमेरिका, ब्रिटन, न्यूझीलँड आणि फ्रान्सनेही सुरक्षेच्या कारणामुळे टिकटॉकवर अशीच बंदी घातली आहे. टिकटॉकची मूळ कंपनी बाइट डान्सने हेरगिरीचे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. तरी देखील या विकसित देशांनी आता या चीनी कंपनील आपल्या देशातून हद्दपार करण्याच्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.
ऑस्ट्रेलियन ऍटर्नी-जनरल मार्क ड्रेफस यांनी गुप्तचर आणि सुरक्षा एजन्सींचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर मंगळवारी या बंदीची घोषणा केली. या आदेशाची लवकरात लवकर अंमलबजावणी केली जाईल असे स्पष्ट केले.
सीएनएनच्या रिपोर्टनुसार, ऑस्ट्रेलियन सरकारच्या टिकटॉकवर बंदी घालण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ऑस्ट्रेलिया टिकटॉकचे व्यवस्थापक ली हंटर म्हणाले, की कंपनी सरकारच्या निर्णयामुळे निराश आहे. हंटरने हा निर्णय राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले आहे.
अॅटर्नी जनरल विभागाच्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, वापरकर्त्यांचा डेटा मोठ्या प्रमाणावर संग्रहित केल्यामुळे आणि परदेशी सरकारकडून न्यायालयीन सूचना मिळाल्यामुळे टिकटॉक सुरक्षा आणि गोपनीयतेला गंभीर धोका निर्माण करत आहे. त्यामुळे सरकारी उपकरणांवर त्याचा वापर थांबवावा.
80 लाख युजर्स
या संदर्भात कंपनीने अनेकवेळा सरकारशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचे हंटर यांनी सांगितले. टिकटॉकमुळे ऑस्ट्रेलियाच्या सुरक्षेला कोणताही धोका असल्याचे दाखवणारा असा कोणताही पुरावा आतापर्यंत समोर आलेला नाही. टिकटॉकचे म्हणणे आहे, की ऑस्ट्रेलियामध्ये १८ वर्षांवरील सुमारे ८० लाख लोक टिकटॉक वापरत आहेत.
अमेरिका-कॅनडाचा दणका
दरम्यान, मागील मार्च महिन्यात अमेरिका आणि कॅनडाने सरकारने (Chinese App Tik Tok Ban in America and Canada) जारी केलेल्या मोबाइल डिव्हाइसवर टिकटॉकच्या वापरावर बंदी घालण्याचे आदेश जारी केले होते. दोन्ही देशांनी डेटा सुरक्षेच्या कारणांचा हवाला देत हे पाऊल उचलले आहे.
असे अनेक देश आणि प्रदेश आहेत ज्यांनी TikTok वर आंशिक किंवा पूर्ण बंदी लागू केली आहे. गोपनीयता आणि सुरक्षिततेच्या कारणामुळे भारताने 2020 मध्ये टिकटॉक आणि मेसेजिंग अॅप WeChat सह इतर डझनभर चीनी अॅप्सवर बंदी घातली.
तैवान
तैवान (Taiwan) डिसेंबर 2022 मध्ये, FBI ने Tiktok ने राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण केल्याचा इशारा दिल्यानंतर तैवानने TikTok वर बंदी लादली. मोबाइल फोन, टॅब्लेट आणि डेस्कटॉप कॉम्प्युटरसह सरकारी उपकरणांना चिनी बनावटीचे सॉफ्टवेअर वापरण्याची परवानगी नाही.
अमेरिका
या आठवड्यात यूएस सरकारी एजन्सींना डेटा सुरक्षेच्या कारणामुळे फेडरल डिव्हाइसेस आणि सिस्टममधून टिकटॉक काढून टाकण्यासाठी 30 दिवसांचा अवधी आहे. ही बंदी केवळ सरकारी उपकरणांवर लागू होते, जरी काही यूएस खासदार पूर्णपणे बंदी घालण्याची वकिली करत आहेत.
कॅनडा
त्याच वेळी अमेरिकेच्या घोषणेनंतर, कॅनडाने सोमवारी जाहीर केले की सरकारने जारी केलेल्या उपकरणांनी टिकटॉक वापरू नये. गोपनीयतेसाठी आणि सुरक्षिततेसाठी ‘न स्वीकार्य’ धोका असल्याचे कारण सरकारने नमूद केले आहे. यासोबतच कर्मचाऱ्यांना भविष्यात अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यापासूनही रोखले जाणार आहे.
युरोपियन युनियन
युरोपियन संसद, युरोपियन कमिशन आणि युरोपियन युनियन कौन्सिल, युरोपियन युनियनच्या तीन प्रमुख संस्थांनी कर्मचाऱ्यांच्या उपकरणांवर टिकटॉकवर बंदी घातली आहे. युरोपियन संसदेने मंगळवारी जाहीर केलेली बंदी 20 मार्चपासून लागू झाली आहे. त्यांनी खासदार आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक उपकरणांमधून अॅप काढून टाकण्याची शिफारस केली आहे.
पाकिस्तान
चीनचा मित्र देश असलेल्या पाकिस्ताननेही ऑक्टोबर 2020 पासून किमान चार वेळा टिकटॉकवर तात्पुरती बंदी घातली आहे.
अफगाणिस्तान
दुसरीकडे, अफगाणिस्तानच्या तालिबान नेतृत्वाने 2022 मध्ये टिकटॉक आणि चायनीज गेम PUBG वर बंदी घातली. या निर्णयामुळे चीनी कंपनीला मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.