दिल्ली – ‘पाण्यावर तरंगणारे शहर’, ऐकायला आश्चर्य वाटेल. पण हे आश्चर्य दक्षिण कोरियाच्या (South Korea) बुसान शहरात पाहायला मिळणार आहे. युनायटेड नेशन्सच्या (United Nations) मदतीने शास्त्रज्ञ येथे जगातील पहिल्या तरंगत्या शहराचा नमुना विकसित करत आहेत. OCEANIX असे या प्रकल्पाचे नाव असून त्याची घोषणा गेल्या वर्षी करण्यात आली होती. आता या शहराच्या नव्या रचनेची चित्रे समोर आली आहेत.
2025 पर्यंत तयार होणाऱ्या या तरंगत्या शहराच्या उभारणीसाठी एकूण $200 दशलक्ष किंवा 15 अब्ज रुपयांहून अधिक खर्च केला जाईल असा अंदाज आहे. साधारण 15.5 एकर क्षेत्रात हे शहर असेल आणि येथे 12 हजार लोक राहू शकतील, असे नियोजन आहे.
हे शहर एका तलावावर अनेक पूलांसह बांधले जाईल. शहराच्या पायामध्ये अनेक प्लॅटफॉर्म (Platform) असतील जे एकमेकांना जोडलेले असतील आणि एकत्रितपणे 15.5 एकर क्षेत्रफळ असलेल्या शहराला आकार देईल. निवास, संशोधन आणि निवासाच्या सुविधांसह शहराचे वेगवेगळे भाग केले जाणार असून शहरातील इमारतींची उंची कमी असेल. कंपनीने सांगितले की, शहरातील इमारती सात मजल्यांपेक्षा कमी उंचीच्या असतील जेणेकरून जोरदार वाऱ्याचा त्यांच्यावर परिणाम होणार नाही.
सुरुवातीला शहराची क्षमता 12,000 रहिवाशांची असेल. भविष्यात त्याची क्षमता 1,00,000 लोकांपर्यंत वाढवता येईल, असे म्हणणे आहे. शहरातील प्रत्येक बेटाचा आकार षटकोनी असेल आणि सर्व काँक्रीटपेक्षा तीनपट अधिक मजबूत असलेल्या चुनखडीच्या थराने झाकलेले असेल.