World Cup Prize Money : विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय संघाचा पराभव करत विजेतेपद पटकावले आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून फलंदाज ट्रॅव्हिस हेडने महत्त्वाची भूमिका बजावली.
त्याचवेळी जेतेपदाच्या विजयानंतर ऑस्ट्रेलियावर पैशांचा जोरदार पाऊस पडला. फायनल जिंकल्यानंतर कांगारू संघाला 33.31 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. त्याचबरोबर फायनल हरल्यानंतरही टीम इंडियाही मालामाल झाली आहे. आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या विजेत्या संघ ऑस्ट्रेलियाला बक्षीस रक्कम म्हणून 33.31 कोटी रुपयांची मोठी रक्कम मिळाली आहे.
तर उपविजेत्या टीम इंडियाच्या खात्यात 16.65 कोटी रुपये जमा झाले आहेत. स्पर्धेपूर्वीच आयसीसीने स्पर्धेतील विजेत्या आणि उपविजेत्याला बक्षीस रक्कम देण्याची घोषणा केली होती.
टीम इंडियाला लीग स्टेजचा फायदा झाला
आयसीसीने ग्रुप स्टेज मॅच जिंकणाऱ्या टीम्सला 40 हजार डॉलर्स देण्याची घोषणाही केली होती. याचा अर्थ ग्रुप स्टेजमधील एका विजयासाठी 40 हजार डॉलर्स मिळतील. भारतीय संघाबद्दल बोलायचे झाले तर, संघाने ग्रुप स्टेजमध्ये 9 सामने खेळले आहेत आणि ते सर्व जिंकले आहेत. त्यानुसार संघाला प्रत्येक विजयी सामन्यासाठी 40 हजार डॉलर्स देण्यात आले.
जर आपण स्पर्धेच्या संपूर्ण बक्षीस रकमेबद्दल बोललो तर ती 83.29 कोटी म्हणजे 10 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स होती. विजेत्या आणि उपविजेत्या संघांव्यतिरिक्त, उपांत्य फेरीत पोहोचलेल्या आणि लीग टप्प्यातून बाहेर पडलेल्या उर्वरित सहा संघांनाही बक्षीस रक्कम मिळाली.
इतका पैसा या संघांना मिळाला
दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडच्या संघांना उपांत्य फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. या दोन्ही संघांना विश्वचषकातून 6.66 कोटी रुपये मिळाले आहेत. बाद फेरीतून बाहेर पडलेल्या सर्व 6 संघांना 33.61 लाख रुपयांचे बक्षीस मिळाले आहे.