World Cup 2023 : क्रिकेट जगतातील सर्वात मोठी स्पर्धा विश्वकप 2023 (World Cup 2023) ची उलटगणती सुरू झाली आहे. 5 ऑक्टोबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघही मोठ्या तयारीनिशी उतरणार आहे. या संघात कोणते खेळाडू असतील हे अद्याप निश्चित नाही. मात्र, तरीही एका युवा खेळाडूने आपल्या खेळ आणि कौशल्याच्या जोरावर संघात जागा मिळवण्यासाठी दावेदारी केली आहे.
वेस्टइंडिज विरुद्ध टी 20 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाचा पराभव झाला असला तरी या स्पर्धेत या युवा खेळाडूच्या प्रदर्शनाने सारेच थक्क झाले आहेत. हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नाही तर तिलक वर्मा (Tilak Varma) आहे. तिलकने याच मालिकेतून पदार्पण केले आहे. तिलकची शानदार कामगिरीने प्रभावित होत त्याला विश्वचषकात संधी मिळाली पाहिजे अशी मागणी माजी खेळाडू रॉबिन उथप्पा याने केली आहे. तसेच त्याने तिलक वर्माबाबत मोठे भाकित देखील केले आहे.
एका मुलाखतीत उथप्पा म्हणाला, तिलकचा परफॉर्मन्स पाहून संघाचे सिलेक्टर्स त्याचा विचार नक्कीच करतील. बराच काळ खेळू शकेल अशा खेळाडूचा शोध संघाकडून केला जात आहे. त्यासाठी तिलक वर्मासारखा दुसरा खेळाडू असू शकणार नाही. त्याच्या फलंदाजीत वेगळेपण नक्कीच आहे. वेस्टइंडिज विरुद्धच्या मालिकेत तिलकने जबरदस्त कामगिरी केली. प्रत्येक सामन्यात त्याने चांगले योगदान दिले. पहिल्या टी 20 सामन्यात 39, दुसऱ्या सामन्यात 51, तिसऱ्या सामन्यात नाबाद 49, चौथ्या सामन्यात 7 आणि पाचव्या सामन्यात 27 धावांची खेळी केली.
केएल राहुल, अय्यरच्या गैरहजेरीचा होऊ शकतो फायदा
या स्पर्धेनंतर टीम इंडियाने एशिया कप आणि विश्वकपवर लक्ष केंद्रीत केले आहे. तिलक वर्माने अजून एकदिवसीय सामन्यात पदार्पण केलेले नाही. सध्या केएल राहुल आणि श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त असल्याने संघाच्या बाहेर आहेत. ते संघात कधी परततील याबाबत अजूनही खात्रीशीर माहिती नाही. अशा परिस्थितीत तिलक वर्माला संघात संधी मिळू शकते. कारण वेस्टइंडिज विरुद्धच्या मालिकेत त्याने ज्या पद्धतीने कामगिरी केली त्यामुळे संघाच्या निवड समितीच्या सदस्यांना त्याच्याकडे दुर्लक्ष करणे आता परवडणारे नाही.