World Cup 2023 : कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकरने (Ajit Agarkar) वनडे वर्ल्डकपसाठी (World Cup 2023) टीम इंडियाची (Team India) घोषणा केली. मात्र, संजू सॅमसनला 15 सदस्यीय संघात स्थान मिळालेले नाही. एकदिवसीय विश्वचषक (World Cup 2023) 5 ऑक्टोबरपासून भारतात खेळवला जाणार आहे.
भारतीय संघ 2011 नंतरच्या विश्वचषक ट्रॉफीची वाट पाहत आहे. 15 सदस्यीय संघाबद्दल बोलायचे झाले तर 6 खेळाडू असे आहेत जे प्रथमच एकदिवसीय विश्वचषकात खेळताना दिसणार आहेत. त्यात शुभमन गिल, इशान किशन, सूर्यकुमार यादव, सिराज, शार्दुल ठाकूर आणि श्रेयस अय्यर यांचा समावेश आहे. अक्षर पटेल प्रथमच विश्वचषक सामना खेळू शकतो. तो 2015 मध्ये दाखल झालेल्या संघाचाही एक भाग होता परंतु, त्याला कोणत्याही सामन्यात संधी मिळाली नाही. 4 खेळाडू 3 किंवा अधिक वेळा विश्वचषक खेळताना दिसतील. यामध्ये विराट कोहली सर्वात अनुभवी आहे.
जसप्रीत बुमराह, शमी आणि कुलदीप यादव यांना विश्वचषकात गोलंदाज म्हणून संघात संधी मिळाली आहे. हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि शार्दुल ठाकूर यांची अष्टपैलू म्हणून निवड करण्यात आली आहे. रोहित शर्माशिवाय फलंदाजीची जबाबदारी शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल आणि इशान किशन यांच्यावर असेल. कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ता अजित आगकर यांनी संघाची घोषणा केली.
विराट कोहलीचा हा चौथा विश्वचषक असेल. वर्ल्डकपबाबतीत तो टीम इंडियाचा सर्वात अनुभवी खेळाडू आहे. त्याने 2011, 2015 आणि 2019 चा विश्वचषकही खेळला आहे. भारतीय संघाने 2011 मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वात शेवटच्या वेळी विश्वचषक जिंकला होता. याशिवाय रोहित शर्मा, अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि वेगवान गोलंदाज शमी यांच्यासाठी हा तिसरा विश्वचषक असेल. हे तिन्ही खेळाडू
2015 आणि 2019 च्या विश्वचषक स्पर्धेत सहभागी झाले होते. मात्र, विश्वचषकासाठी जाहीर करण्यात आलेल्या संघात यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनला संधी मिळालेली नाही. इशान किशन आणि केएल राहुल यष्टिरक्षक म्हणून संघात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरले आहेत. टी-20 चा नंबर-1 फलंदाज सूर्यकुमार यादवही विश्वचषक संघात आहे. जरी त्याचा वनडे रेकॉर्ड काही खास नाही.
विश्वचषकासाठी निवडलेल्या १५ सदस्यीय संघाबाबत बोलायचे झाले तर फक्त विराट कोहलीच वनडे विश्वचषक जिंकू शकला आहे. अशा परिस्थितीत इतर 14 खेळाडूंना पहिला विश्वचषक जिंकण्याची संधी आहे. 2011 मध्ये संघाने घरच्या मैदानावर इतिहास रचला. भारतीय संघाने 1983 आणि 2011 मध्ये दोनदा विश्वचषक जिंकला आहे.
दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक 5 वेळा विजेतेपद पटकावले आहे. याशिवाय वेस्ट इंडिजनेही दोनदा विश्वचषक जिंकला आहे, तर श्रीलंका, पाकिस्तान आणि इंग्लँडने प्रत्येकी एकदा विश्वचषक जिंकला आहे. वेस्टइंडिजचा संघ यावेळी पात्र ठरू शकला नाही.
टीम इंडिया सध्या आशिया कपमध्ये चांगली कामगिरी करत आहे. सुपर-4 मध्ये त्याचा सामना 10 सप्टेंबरला पाकिस्तानशी होणार आहे. विश्वचषकापूर्वी संघाला या स्पर्धेतून आपली कमतरता दूर करायची आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियाकडून 3 सामन्यांची एकदिवसीय मालिकाही आहे. विश्वचषक 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान खेळवला जाणार आहे.
या स्पर्धेत एकूण 10 संघांचा सहभाग आहे. सर्व संघांना 9-9 सामने खेळायचे आहेत. यानंतर टॉप-4 संघ उपांत्य फेरीत जातील. एकूण 10 ठिकाणी सामने होणार आहेत. सलामीचा सामना, भारत-पाकिस्तान सामना आणि अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. उपांत्य फेरीचे सामने 15 आणि 16 नोव्हेंबर रोजी खेळवले जातील. या स्पर्धेत एकूण 48 सामने होणार आहेत.
वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव.
टीम इंडियाचे वेळापत्रक
8 ऑक्टोबर विरुद्ध ऑस्ट्रेलिया, चेन्नई
11 ऑक्टोबर विरुद्ध अफगाणिस्तान, दिल्ली
14 ऑक्टोबर विरुद्ध पाकिस्तान, अहमदाबाद
19 ऑक्टोबर विरुद्ध बांगलादेश, पुणे
22 ऑक्टोबर विरुद्ध न्यूझीलँड, धर्मशाला
29 ऑक्टोबर विरुद्ध इंग्लँड, लखनौ
2 नोव्हेंबर विरुद्ध श्रीलंका, मुंबई
५ नोव्हेंबर विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कोलकाता
12 नोव्हेंबर विरुद्ध नेदरलँड, बंगळुरू