World Cup 2023 : भारतीय क्रिकेट संघाचा (Team India) कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) ICC क्रिकेट विश्वचषकापूर्वी (World Cup 2023) दबावाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ‘कॅप्टन डे’च्या निमित्ताने रोहित म्हणाला की, आता आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करण्याची वेळ आली आहे. घरच्या मैदानावर विश्वचषक जिंकणे हे टीम इंडियासमोर सर्वात मोठे आव्हान आहे. भारतीय संघ दोन वेळा विश्वविजेता आहे. तिसर्यांदा ही चमकणारी ट्रॉफी उंचावण्याचे उद्दीष्ट संघाने ठेवले आहे. विश्वचषक स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून भारतात होणार आहे. या स्पर्धेत 10 संघ सहभागी होणार आहेत. 46 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत एकूण 48 सामने खेळवले जाणार आहेत.
महेंद्रसिंग धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखाली भारताने 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. यानंतर 2015 मध्ये ऑस्ट्रेलियाने (Australia) आणि 2019 मध्ये इंग्लँडने (England) त्यांच्या भूमीवर विजेतेपद पटकावले. आता भारतीय संघाने हाच क्रम सुरू ठेवण्याची अपेक्षा आहे. रोहित शर्माचा हा शेवटचा एकदिवसीय विश्वचषक असू शकतो. अशा परिस्थितीत तो जिंकून आपल्या घरी होणारा विश्वचषक संस्मरणीय बनवू इच्छितो.
अहमदाबादमध्ये आयसीसीने आयोजित केलेल्या ‘कॅप्टन डे’च्या निमित्ताने रोहित म्हणाला, ‘मला काय धोक्यात आहे याची चांगली जाणीव आहे. संघाचा भाग असलेल्या खेळाडूंना काय धोक्यात आहे याची जाणीव असते. आता सर्व काही विसरण्याची आणि संघ म्हणून आपल्याला काय हवे आहे यावर लक्ष केंद्रित करण्याची वेळ आली आहे.’ विश्वचषक ही मोठी स्पर्धा असल्यामुळे आपल्या संघाने एका वेळी एकाच सामन्यावर लक्ष केंद्रित करावे असे रोहितला वाटते.
रोहितच्या मते, मागील तीन विश्वचषकांचा इतिहास पाहिला तर ‘यजमान देशाने गेल्या तीन विश्वचषकांमध्ये विजेतेपद पटकावले आहे. ही एक दीर्घकालीन स्पर्धा आहे आणि तुम्ही फार पुढे विचार करू शकत नाही. येथे आपल्यासाठी प्रयत्न करणे आणि ध्येयावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. भारतीय खेळाडू अपेक्षांच्या ओझ्यातून स्वत:ला मुक्त करू शकतील, असे रोहितने सांगितले.
रोहित म्हणाला, ‘आम्हाला अपेक्षांबद्दल काळजी करण्याची गरज नाही, कारण तुमच्याकडून नेहमी काहीतरी अपेक्षा असते. बाहेर कोण खेळत आहे आणि काय चालले आहे याची काळजी करण्याची गरज नाही कारण हीच वेळ आहे ध्येयावर लक्ष केंद्रित करण्याची. आमचे खेळाडू मायदेशात खेळत असोत की परदेशात दडपणातून कसे बाहेर पडायचे हे माहित असते. दबाव ही अशी गोष्ट आहे जी खेळाडूला कधीही सोडत नाही. हे नेहमीचे असेल त्यामुळे ते विसरून जा आणि आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा, असे रोहित म्हणाला. भारतीय संघ 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यापासून आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे.