World Cup 2023 : टीम इंडियाने विश्वचषकातील पहिल्याच (World Cup 2023) सामन्यात ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाला धूळ चारत स्पर्धेतील विजयी वाटचाल सुरू केली आहे. या विजयानंतर आज बुधवारी भारतीय संघाचा दुसरा अफगाणिस्तानबरोबर (IND vs AFG) सुरू आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) तुफानी खेळी करत शतक ठोकले. त्याने फक्त शतकच केले नाही तर क्रिकेट जगतातील उत्कृष्ट फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याचा रेकॉर्डही तोडला.
सचिनने आपल्या कारकिर्दीत वर्ल्ड कपमध्ये एकूण 6 शतके झळकावली होती. या सामन्यापूर्वी विश्वचषकात रोहितची केवळ सहा शतके होती. आज सातवे शतक झळकावून तो या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आला आहे. रोहित शर्माने 63 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. यादरम्यान त्याने 12 चौकार आणि 3 षटकारही मारले.
ख्रिस गेला झटका, रोहित बनला नंबर वन
या सामन्यात रोहितने षटकारांचा विक्रमही आपल्या नावावर केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा तो फलंदाज ठरला आहे. त्याने आपला 554 वा षटकार ठोकताच वेस्ट इंडिजचा पॉवर हिटर ख्रिस गेलला (Chris Gayle) मागे सोडले. गेल या बाबतीत आतापर्यंतचा सर्वोत्तम फलंदाज होता. गेलने आपल्या कारकिर्दीत 553 षटकार मारले होते. रोहित शर्माने अफगाणिस्तानविरुद्ध चौकार आणि षटकार ठोकले. त्याने अवघ्या 30 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यावर त्याचे समाधान झाले नाही. सामन्यातही त्याची स्फोटक खेळी कायम राहिली आणि त्याने आपले शतक पूर्ण केले.
अफगाणिस्तानला 272 धावांत रोखले
दरम्यान, या सामन्यात अफगाणिस्तानच्या नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत झालेल्या विश्वचषक सामन्यांमध्ये दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमच्या खेळपट्टीवर मोठ्या प्रमाणावर धावा होत असल्याचे दिसून आले आहे. यावेळीही असेच काहीसे घडले. अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी या मैदानावर भरपूर चौकार आणि षटकार मारले. अफगाणिस्तान संघाने भारताला विजयासाठी 300 धावांचे लक्ष्य देईल असे एकवेळ वाटत होते. मात्र, हे घडले नाही. गोलंदाजांनी जोरदार पुनरागमन करत भारताच्या अफगाणिस्तानला 272 धावात रोखले. जसप्रीत बुमराहने चार विकेट घेतल्या. उपकर्णधार हार्दिक पांड्यानेही आठ विकेट्स आपल्या नावावर केल्या.