World Cup 2023 : भारतात होणाऱ्या आयसीसी विश्वचषकासाठी (World Cup 2023) ऑस्ट्रेलियाने आपला 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये संघाचा सर्वात ताकदवान फलंदाज मानल्या जाणाऱ्या मार्नस लॅबुशेनचा संघात समावेश करण्यात आलेला नाही. त्याचबरोबर कॅमेरून ग्रीन प्रथमच विश्वचषकात खेळताना दिसणार आहे.
लबुशेनला जागा नाही
ऑस्ट्रेलियाने विश्वचषक स्पर्धेसाठी निवडलेल्या 15 सदस्यीय संघात मार्नस लॅबुशेनचा समावेश केलेला नाही. लॅबुशेनची संघात अनुपस्थिती थोडी आश्चर्यकारक आहे. वेगवान गोलंदाज शॉन अॅबॉटचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर कॅमेरून ग्रीनही वर्ल्डकपसाठी निवडकर्त्यांचा विश्वास जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. जोश इंग्लिसलाही संघात स्थान देण्यात आले आहे.
फलंदाजीत कोण कोण?
ऑस्ट्रेलियाने फलंदाजीत अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथवर विश्वास व्यक्त केला आहे. स्मिथशिवाय ग्लेन मॅक्सवेल, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर यांच्याकडे या मेगा स्पर्धेत संघाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी असेल. मार्श सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून त्याने अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकेत जबरदस्त कामगिरी केली.
गोलंदाजी आक्रमण कसे?
ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीचे नेतृत्व कर्णधार पॅट कमिन्सकडे असेल. मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, शॉन अॅबॉट कमिन्सला सपोर्ट करताना दिसतील. त्याचबरोबर फिरकी विभागाची जबाबदारी अॅडम झाम्पा, अॅश्टन आगर यांच्या खांद्यावर असेल. प्रत्येक विश्वचषकात स्टार्कची कामगिरी अव्वल ठरली आहे आणि यावेळीही संघाला आपल्या प्रमुख वेगवान गोलंदाजाकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असेल.
पहिल्या सामन्यात भारताशी भिडणार
विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचा पहिला सामना भारतासोबत 8 ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे होणार आहे. विश्वचषक सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा संघ भारताविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 22 सप्टेंबर, दुसरा सामना 24 आणि शेवटचा सामना 27 सप्टेंबर रोजी होणार आहे.
विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलिया संघ
पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, अॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, ट्रॅव्हिस हेड, अॅश्टन अगर, जोश हेझलवूड, कॅमेरॉन ग्रीन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा, मिचेल स्टार्क, शॉन अॅबॉट.