World Cup 2023 : एकदिवसीय विश्वचषक 5 ऑक्टोबरपासून सुरू (World Cup 2023) होणार आहे. क्रिकेटचा सर्वात मोठा टप्पा तयार झाला आहे. या स्पर्धेतील पहिला सामना इंग्लँड आणि न्यूझीलँड यांच्यात होणार आहे. याआधी आज 28 सप्टेंबर रोजी सर्व संघांना त्यांच्या 15 सदस्यीय संघात बदल करण्याची संधी आहे. ऑस्ट्रेलियाने (Australia) या स्पर्धेसाठी जाहीर केलेल्या आपल्या संघात मार्नस लाबुशेनचा समावेश करून मोठा बदल केला आहे, तर फिरकी अष्टपैलू एश्टन अॅगर दुखापतीमुळे बाहेर या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. ऑस्ट्रेलियासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
ऑस्ट्रेलियाच्या 15 सदस्यीय विश्वचषक संघात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेदरम्यान दुखापतग्रस्त ट्रॅव्हिस हेडचाही समावेश आहे. याशिवाय संघात कोणतेही मोठे बदल करण्यात आलेले नाहीत. पहिल्या काही सामन्यांसाठी हेड उपलब्ध होणार नाही, त्यामुळे ऑस्ट्रेलिया 14 पैकी 11 खेळाडू निवडेल.
ऑस्ट्रेलियाच्या विश्वचषक संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी पॅट कमिन्सकडे असणार आहे. तर डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन आणि ट्रॅव्हिस हेड मुख्य फलंदाजांच्या भूमिकेत असतील. याशिवाय अष्टपैलू खेळाडूंच्या बाबतीत कांगारू संघाकडे बरेच पर्याय आहेत, ज्यामध्ये कॅमेरॉन ग्रीन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस आणि शॉन अॅबॉट हे खळबळ उडवू शकतात. कर्णधार कमिन्सशिवाय मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड आणि अॅडम झाम्पा यांचा गोलंदाजीत समावेश करण्यात आला आहे. अॅलेक्स कॅरी आणि जोश इंग्लिश या दोन यष्टीरक्षकांचाही संघात समावेश करण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलियाचा 15 सदस्यीय संघ
डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन, अॅलेक्स कॅरी (wk), जोश इंग्लिश (wk), कॅमेरॉन ग्रीन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, शॉन अॅबॉट, पॅट कमिन्स (c), मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, अॅडम झाम्पा.
पहिलाच सामना भारताविरुद्ध
एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये, ऑस्ट्रेलिया संघ आपला पहिला सामना भारताविरुद्ध 8 ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे खेळणार आहे. यानंतर संघ 12 ऑक्टोबरला लखनऊमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसरा सामना खेळणार आहे. तर 16 ऑक्टोबरला याच मैदानावर ऑस्ट्रेलियाचा श्रीलंकेशी सामना होणार आहे.