नवी दिल्ली : चीनच्या वाढत्या मुजोरीमुळे जगातील अनेक देश हैराण झाले आहेत. चीनच्या या स्वभावाचा फटका जपानसारख्या विकसित देशालाही बसत आहे. चीनपासून या देशाला नेहमीच धोका राहिला आहे. त्यामुळे जपान सरकार नेहमी आपल्या संरक्षण बजेटमध्ये वाढ करत असते. आताही जपानने आपल्या संरक्षण बजेटमध्ये विक्रमी वाढ केली आहे. जपानच्या मंत्रिमंडळाने एप्रिल 2022 पासून नवीन आर्थिक वर्षासाठी 47.2 अब्ज डॉलरच्या संरक्षण बजेटला मंजुरी दिली आहे. जपानने सलग दहाव्या वेळेस बजेटमध्ये वाढ केली आहे. यामागे एकमेव कारण म्हणजे चीनची सातत्याने वाढत असलेली आक्रमकता असल्याचे मानले जात आहे.
जपानच्या संरक्षण बजेटने आता देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाचा (जीडीपी) एक टक्का पार केला आहे. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अहवालानुसार, जपानचे लष्करी बजेट त्याचा मित्र देश अमेरिकेच्या तुलनेत फारच कमी आहे. अमेरिका आपल्या संरक्षण बजेटवर 778 अब्ज खर्च करणार आहे, त्यानंतर चीन 252 अब्ज डॉलर्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
सन 2020 मध्ये हाँगकाँगवर चीनच्या दडपशाही धोरणामुळे जपान आणि चीनमधील संबंध ताणले गेले आहेत. दोन्ही देश अनेक बेटांवर सार्वभौमत्वाचा दावा करतात आणि या मुद्द्यावर पूर्व चीन समुद्रात दोन्ही देशांची जहाजे एकमेकांचा पाठलाग करत असतात.
तसे पाहिले तर सध्याच्या परिस्थितीत जपानला चीनपासून धोका वाढला आहे. त्यामुळे जपान सतर्क आहे. जपानी सैन्य मजबूत करण्यात अमेरिका सातत्याने मदत करत आहे. त्यामुळे चीनच्या आक्रमकतेला काही प्रमाणात अटकाव निर्माण झाला आहे. मात्र, चीनचा आक्रमकपणा लक्षात घेता ही परिस्थिती फार काळ कायम राहिल याबाबत आता काही सांगता येणे अशक्य आहे. मात्र, चीनचा वाढता धोका लक्षात घेत खबरदारी म्हणून जपानने हा निर्णय घेतला आहे.
अर्र.. चीनच्या विमानांनीही दिलाय धोका..! ‘त्या’ लहान देशाला बसलाय कोट्यावधींचा फटका