Luna 25 : रशियाच्या (Russia) ‘मिशन मून’ला रविवारी मोठा झटका बसला. रशियाचे लुना-25 (Luna 25) हे अंतराळ यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यापूर्वी कोसळले. 14 ऑगस्ट रोजी प्रक्षेपित केलेले लुना-25 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार होते. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अवकाशयान उतरवण्याचे रशियाचे स्वप्न सध्या भंगले आहे.
तब्बल पाच दशकांनंतर रशियाने चंद्रावर जाण्यासाठी मून मिशन (Moon Mission) सुरू केले. Luna-25 अंतराळयान चंद्रावर यशस्वीरीत्या उतरण्यात अयशस्वी का झाले हे आपण प्रथम समजून घेऊ.
चंद्रावर उतरण्यापूर्वी Luna-25 या अवकाशयानाची कक्षा योग्य प्रकारे बदलणे आवश्यक होते. अंतराळयान योग्यरित्या कक्षा बदलण्यात अयशस्वी झाले. रशियन स्पेस एजन्सीने माहिती दिली की Luna-25 ला कक्षेत प्रवेश करण्याची आज्ञा मिळाली आणि प्री-लँडिंगसाठी कक्षेत पाठवण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली. त्याचवेळी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आणि मोहिम काही पूर्ण होऊ शकली नाही.
Luna 25 अंतराळयान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यासाठी कमी वेग मर्यादा राखू शकले नाही. त्यामुळे यान अलगद उतरण्याआधीच क्रॅश झाले.
फ्रान्सचे अंतराळ वैज्ञानिक आणि उल्कापिंडांचा अभ्यास करणारे तज्ज्ञ फ्रँक मार्चिस यांच्या मते, सॉफ्टवेअर त्रुटींमुळे लुना ग्लोब लँडर योग्यरित्या कार्य करू शकला नाही. महत्त्वपूर्ण कक्षा समायोजनादरम्यान अनपेक्षित इंजिन ओव्हरफायर झाल्यामुळे मिशन अयशस्वी झाले.
रशियन स्पेस एजन्सीने माहिती दिली की मिशन अयशस्वी होण्याच्या कारणांची चौकशी करण्यासाठी एक आयोग स्थापन केला जाईल. पाच दशकांत पहिल्यांदाच रशियाची चंद्र मोहीम अयशस्वी झाली आहे. 1976 मध्ये सोव्हिएत युनियनच्या काळात लुना-24 यशस्वीरित्या चंद्रावर पाठवण्यात आले होते.
Luna-25 ने फोटो शेअर केला होता
Luna-25 ने लँडर सोबत नेले आणि 19 ऑगस्ट रोजी रशियाने Luna-25 द्वारे पाठवलेले चित्र शेअर केले. हे छायाचित्र जीमन क्रेटरचे छायाचित्र असल्याची माहिती रशियाने दिली होती. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर असलेल्या सुमारे 20 खोल खड्ड्यांमध्ये जीमन नावाचे विवर हे तिसरे सर्वात मोठे विवर आहे. हे विवर सुमारे 190 किमी रुंद आणि 8 किमी खोल आहे.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणे सोपे नाही
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अवकाशयान उतरवणे खूप अवघड आहे कारण, चंद्राचा उत्तर किंवा मध्य भाग सपाट आहे आणि योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश मिळतो. त्याच वेळी, प्रकाश दक्षिण ध्रुवापर्यंत पोहोचत नाही. त्याचबरोबर या भागात खड्डे भरले आहेत. याशिवाय चंद्रावरील गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या तुलनेत 16.6 टक्के आहे. त्याच वेळी, चंद्रावर कोणतेही उपग्रह सिग्नल नेटवर्क नाही. पर्यावरणीय अडचणींमुळे चंद्राचे ध्रुवीय प्रदेश अतिशय विलग भूभाग आहेत. शास्त्रज्ञांच्या मते, ध्रुवीय विवरांच्या खडकांमध्ये मुबलक प्रमाणात पाणी असू शकते.
Luna 25 चंद्रावर का पाठवले गेले?
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लुना-25 पाठवण्याचे रशियाचे उद्दिष्ट चांद्रयान-3 (Chandrayaan 3) सारखेच आहे. म्हणजेच, चंद्राच्या या भागात असलेल्या खडक आणि धूलिकणांचे नमुने मिळवणे हा लुना-25 चा उद्देश होता.
विशेष म्हणजे, रशिया आपल्या आगामी चंद्र मोहिमांवर म्हणजेच लुना-26, 27 आणि 28 वर काम करत आहे, परंतु रशियाच्या आगामी अंतराळ मोहिमेला थोडा विलंब होईल अशी अपेक्षा आहे. रशियन अंतराळ कार्यक्रम आर्थिक आणि तांत्रिकदृष्ट्या संघर्ष करत आहे.
आता जगाच्या नजरा चांद्रयान-३ वर
भारताचे चांद्रयान-3 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6.4 वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले. जरी रशियाचे लुना 25 (Luna 25) चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या पोहोचण्यात अयशस्वी झाले असले तरी भारताने मात्र ही कामगिरी यशस्वीपण करून दाखवली.