Wheat Farming Tips : ‘प्रश्न शेतकऱ्यांचे उत्तरे कृषी तज्ज्ञांची’ या लेखनमालेमध्ये शेतकऱ्यांना शेती उपयोगी अशी माहिती देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी कृषी विभागाने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकातील मजकूर आम्ही यामध्ये प्रसिद्ध करत आहोत. यावर आपणास काहीही प्रश्न किंवा मार्गदर्शन हवे असल्यास टीम कृषीरंगच्या मोबाइल नंबरवर टेक्स्ट मेसेज किंवा व्हाटस्अॅप मेसेज करावा. यामध्ये सर्व पिकांची आणि पशुपालन याबद्दल माहिती प्रसिद्ध केली जाणार आहे. ही माहिती वाचण्यासाठी रहा टीम कृषीरंग समवेत..
प्रश्न: गव्हासाठी जमीन कशी निवडावी ?
उत्तर : गहु पिकासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यत ते भारी ज़मीन निवडावी.
प्रश्न : गृह लागवडीसाठी जमिनीची मशागत कशी करावी ?
उत्तर : गव्हाची मुळे ६० सेंमी ते १०0 सेंमी. खोलीपर्यंत वाढत असल्याने गव्हाच्या योग्य वाढीसाठी जमीन चांगली भुसभुशीत असणे आवश्यक आहे. यासाठी खरीप पीक काढणीनंतर लोखंडी नांगराने १५ ते २० सें मीं जमिनीची खोलवर नांगरट करावी. त्यानंतर कुळवाच्या तीन ते चार पाळ्या देऊन जमीन जमीन चांगली भुसमुशीत करावी. शेवटच्या कुळवणी अगोदर २५ ते ३० बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पसरवून टाकावे तसेच पुर्वीच्या पिकांची धसकटे व इतर काडीकचरा वेचून शेत स्वच्छ करावे.
प्रश्न : गहु पेरणीची योग्य वेळ कोणती ?
उत्तर : अ. जिराईती गव्हाची पेरणी ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवाडयात करावी.
ब. बागायत वेळेवर गव्हाची पेरणी शक्य लवकर नोव्हेंबर महिन्याच्या सुरवातीस करावी. पश्चिम महाराष्ट्रातील बागायती क्षेत्रातील काळया जमीनीत सोयाबीन व गहु या पीक पध्दतीमध्ये गव्हाची पेरणी १२ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत करावी.
बागायती गव्हाची पेरणी १५ नोव्हेंबर नंतर उशिरा केल्यास प्रत्येक पंधरवाडयात गव्हाचे उत्पादन हेक्टरी २.५ क्ंविटल एवढे घटते असे आढळून आलेले आहे.
- बागायत उशिरा गव्हाची पेरणी उशिरात उशिरा म्हणजे डिसेंबर अखेरपर्यंत करावी.
- Samsung Galaxy : फक्त साडेसहा हजारांत मिळतोय हा शानदार स्मार्टफोन; पहा, काय आहे डील ?
- Small Saving Schemes : मोदी सरकारची मोठी घोषणा; ‘या’ स्कीमच्या व्याजदरात केली वाढ
- Foods For Lung Health : फुफ्फुसांचं आरोग्य जपा! ‘या’ पदार्थांचा आहारात आजच करा समावेश
- Waste Economy : कचऱ्यातून बक्कळ कमाई! पहा, कशी भरतेय सरकारची तिजोरी ?
- Small Scale Business : फक्त 1 लाखांत सुरू करा ‘हे’ व्यवसाय; मिळेल फायदा, होईल भरभराट
प्रश्न : गव्हाच्या जिरायती लागवडीसाठी शिफारस केलेले वाण कोणते ?
उत्तर : गव्हाच्या जिरायती वेळेवर लागवडीसाठी
अ.जिराईत पेरणीसाठी -पंचवटी (एआयडीडब्ल्यू- १५), शरद (एकेडीडब्ल्यू- २९९७-१६).
ब.जिराईत आणि मर्यादित सिंचन – नेत्रावती (एनआयएडब्ल्यू – १४१५) या प्रकारचे वाण वापरावेत.
प्रश्न : गव्हाच्या बागायत वेळेवर पेरणीसाठी कोणते वाण वापरावेत?
उत्तर : गव्हाच्या बागायत वेळेवर पेरणीसाठी तपोवन (एनआयएडब्ल्यू ९१७), गोदावरी (एनआयडीडब्ल्यू २९५), त्र्यंबक (एनआयएडब्लू – ३०१), एमएसीएस – ६२२२. हे वाण वापरावेत.
प्रश्न : गव्हाच्या उशीरा पेरणीसाठी कोणते वाण चांगले उत्पादन देतात?
उत्तर : गव्हाच्या उशीरा पेरणीसाठी एनआयएडब्ल्यू-३४, एकेएडब्ल्यू-४६२७ हे वाण चांगले उत्पादन देतात.
प्रश्न : गहु पेरणीची योग्य पद्धत कोणती ? गव्हाचे हेक्टरी बियाणे किती वापरावे ?
उत्तर : जिराईती गव्हाची पेरणी पाऊस बंद झाल्यावर, परंतु वाफसा आल्यानंतर करावी. पेरणीसाठी प्रती हेक्टरी ७५ ते १०० किलो बियाणे वापरावे.बी फोकून न देता पाभरीने पेरावे. बागायती वेळेवर पेरणीसाठी जमिनीतील ओलावा नसल्यास जमीन ओलावून घ्यावी. वाफसा आल्यानंतर जमीन सुकवावी, पेरणीसाठी प्रती हेक्टरी १०० ते १२५। किलो बियाणे वापरावे रासायनिक खताचा पहिला हप्ता आणि गहु बियाणे दोन। चाडयांच्या पाभरीने एकत्रित पेरावे. पेरणी एकेरी करावी त्यामुळे आंतर मशागत करणे सुलभ होते बागायत उशिरा पेरणीसाठी प्रति हेक्टरी १२५ ते १५० किलो बियाणे रासायनिक खताच्या पहिल्या हप्त्यासह दोन चाडयाच्या पाभरीने एकेरी पध्दतीने पेरावे.
प्रश्न : पेरणीपूर्वी गव्हाच्या बियाण्यास बीजप्रक्रिया कशी करावी ?
उत्तर : गव्हाच्या बियाण्यास पेरणीपुर्वी १० किलो बियाण्यासाठी २५० ग्रॅम अॅझोटोबॅक्टसचीबीज प्रक्रिया करावी. हे जिवाणू संवर्धक बुरशीनाशक आणि रासायनिक खतांबरोबर एकत्रित मिसळू नये जिवाणू संवर्धकामुळे बियाण्याची उगवण लवकर व चांगली होते तसेच उत्पादनातही वाढ होते.
प्रश्न : जिरायत गव्हासाठी रासायनिक खताची किती मात्रा दयावी ?
उत्तर : जिरायत गव्हास पेरणीच्या वेळी प्रतिहेक्टरी ४० किलो नत्र (८७ कि युरिया) आणि २० किलो स्फुरद (१२५ कि सिंगल सुपर फॉस्फेट) दयावे.
प्रश्न : बागायत वेळेवर गहु पेरतांना कोणती रासायनिक खते वापरावीत?
उत्तर : बागायती वेळेवर पेरणीसाठी प्रतिहेक्टरी २५ ते ३० गाड्या शेणखत वापरावे तसेच प्रति हेक्टरी १२० किलो नत्र, ६० किलो स्फुरद (३७५ कि सिंगल सुपर फॉस्फेट) आणि ४० किलो पालाश (६५ कि म्युरेट ऑफ पोटॅश) दयावे.निम्मे नत्र (१३० कि युरिया) आणि संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्यावेळी दयावे. उरलेले निम्मे नत्र (१३० कि युरिया) पेरणीनंतर तीन आठवड्यांनी खुरपणी करुन दयावे.
प्रश्न : बागायत उशीरा पेरणीसाठी रासायनिक खतांची शिफारस किती आहे ?
उत्तर : बागायती उशीरा पेरणीसाठी पेरणीच्या वेळी प्रती हेक्टरी ४० किलो नत्र (८७ कि युरिया), ४० किलो स्फुरद (२५० कि, सिंगल सुपर फॉस्फेट) आणि ४० किलो पालाश (६५ कि म्युरेट ऑफ पोटॅश) दयावे. पेरणीनंतर तीन आठवडयांनी शेताची खुरपणी करुन प्रती हेक्टरी ४० किलो नत्राची मात्रा (८७ कि.युरिया) दयावी.
प्रश्न : , पाण्याच्या उपलब्धतेनुसार गव्हासाठी योग्य प्रकारे पाणी व्यवस्थापन कसे करावे ?
उत्तर : जिराईत गहू पिकाची वाढ ही जमिनीतील उपलब्ध ओलाव्यावरच होत असते. बागायती वेळेवर आणि बागायत उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकासाठी जमिनीच्या मगदुरानुसारपाण्याच्या पाळ्या कमीजास्त होऊ शकतात. गहू पिकास देण्यासाठी एकच पाणी उपलब्ध असेल तर ते पेरणीनंतर ४० ते ४२ दिवसांनी दयावे, दोन पाणी उपलब्ध असतील तर पहिले पाणी पेरणीनंतर २० ते २२ दिवसांनी आणि दूसरे पाणी ६० ते ६५ दिवसांनी दयावे आणि तीन पाणी उपलब्ध असतील तर पहिले पाणी पेरणीनंतर २० ते २२ दिवसांनी, दुसरे पाणी ४२ ते ४५ दिवसांनी आणि तिसरे पाणी ६० ते ६५ दिवसांनी दयावे.
प्रश्न: गहु पिकाच्या पाणी देण्याच्या संवेदनक्षम अवस्था कोणत्या आहेत. त्यानुसार पाण्याचे व्यवस्थापन कसे करावे?
उत्तर : मुकुटमुळे फुटण्याची (पेरणीनंतर १८ ते २१ दिवस), कांडी घरण्याची (पेरणीनंतर ४० ते ४५ दिवस), पीक औबीवर येण्याची (पेरणीनंतर ६० ते ६५ दिवस) व दाण्यात चीक भरण्याची (पेरणीनंतर ८० ते ८५ दिवस) या गहु पिकाच्या पाणी देण्याच्या संवेदनक्षम अवस्था आहेत.
प्रश्न : गहु पिकामध्ये आंतरमशागत कशी करावी ?
उत्तर : जिराईत गव्हासाठी सर्वसाधारणपणे २० दिवसांच्या अंतराने हात कोळप्याने १ ते २ वेळा कोळपणी करावी. त्यामुळे तणांचा नाश होण्यास मदत होवून जमिनीत ओलावा टिकून राहतो बागायत वेळेवर तसेच बागायत उशिरा पेरलेल्या गव्हास ३ आठवडयांनी खुरपणी करुन नत्राचा दुसरा हप्ता दयावा पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी २० मग्रॅम मेटसल्फेरान मिथाईल (अलग्रीप) हे तणनाशक प्रति एकरी ५०० लि.पाण्यात प्रति हेक्टर या प्रमाणात मिसळून दोन ओळींमध्ये फवारावे त्यामुळे तणांचा बंदोबस्त करणे शक्य होईल.
प्रश्न : गव्हाची प्रत सुधारण्यासाठी काय उपाय योजना करता येईल ?
उत्तर : गव्हाचा दर्जा सुधारण्यासाठी तसेच दाण्यांना रंग आणि चकाकी येण्यासाठी पेरणीनंतर पीक ५५ व ७० दिवसांनी १९:१९:१९ या विद्राव्य खताची २ टक्के (१० लिटर पाण्यात २०० गॅम) या प्रमाणात फवारणी करावी.
प्रश्न : गव्हावरील तांबेरा रोगाचे व्यवस्थापन कसे करावे ?
उत्तर : जिराईत गहू पेरणीसाठी तांबेरा प्रतिबंधक वाणांची निवड केली तर पीक संरक्षणासाठीरोग प्रतिबंधक औषधांची फवारणी करण्याची आवश्यकता भासत नाही बागायत वेळेवर आणि बागायत उशिरा पेरणीसाठीही तांबेरा प्रतिबंधक वाण उपलब्ध असून अशा वाणांचाच पेरणीसाठी वापर करावा. परंतु रोगासाठी पोषक हवामानात तांबेऱ्याची लक्षणे दिसून आल्यास मॅन्कोझेब ३५% एस.सी. २.५ ते २ किलो किंवा प्रोपीकोनॅझोल २५%एस.सी ५०० ग्रॅम हे बुरशीनाशक ५०० लि.पाण्यातून फवारावे.
प्रश्न : गव्हावर येणाऱ्या करपा रोगाचे व्यवस्थापन कशा प्रकारे करता येईल ?
उत्तर : रोगाचे नियंत्रण करण्यासाठी करपा रोगची लक्षणे दिस लागताच मॅन्कोझेब ३५%एस.सी या बुरशीनाशकांची दोन फवारण्या १५ दिवसांच्या अंतराने कराव्यात.
प्रश्न : गव्हाच्या दाण्याची टोके कशाने काळी पडतात त्याचे नियंत्रण कसे करावे ?
उत्तर : गहू पीक पक्व झाल्यानंतर कापणीपुर्वी जर पावसात भिजले किंवा वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण वाढले तर गव्हाच्या काही दाण्यांची टोके काळी पडतात. अशा वेळी मॅन्कोझेब ७५% डब्ल्यु.पी १५०० ग्रॅम या बुरशीनाशकांचे मिश्रण ५०० लि. पाण्यातून प्रतिहेक्टरी फवारावे.
प्रश्न : गव्हावरील मावा किडीचे नियंत्रण करण्यासाठी उपाययोजना सुचवाव्यात ?
उत्तर : मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच डायमेथोएट ५०० मिली ५०० लिटर पाण्यातून किंवा इमीडॅक्लोप्रीड १२५ मिली. ५०० लि.पाण्यातून प्रती हेक्टरी फवारावे.
स्त्रोत :
पुस्तकाचे नाव : प्रश्न शेतकऱ्यांचे उत्तरे कृषी तज्ञांची (वर्ष २०१७)
संकलक : डॉ. आनंद सोळंके, डॉ. कल्याण देवळाणकर, प्रा. मंजाबापू घोरपडे, डॉ. दत्तात्रय पाचारणे, डॉ. योगेश कांदळकर, डॉ. संदीप पाटील
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, विस्तार शिक्षण संचालनालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. अहमदनगर
वेबसाईट : www.mpkv.ac.in ; फोन : ०२४२६ २४३८६१ ; ईमेल : [email protected]
पुस्तक आर्थिक सहाय्य : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), अहमदनगर (कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य)
कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 08830113528 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा.. *(टायपिंग चूक झाल्यास क्षमस्व. त्याबद्दल प्रतिक्रिया लिहून सहकार्य करावे, ही वाचकांना नम्र विनंती)