Weather Update : देशातील बहुतेक भागात मुसळधार पावसाने कहर केल्याने आता जनजीवन विस्कळीत झाले आहे. सध्या काही राज्यात मुसळधार पाऊस तर काही राज्यात संततधार पाऊस कोसळत आहे.
यातच महाराष्ट्रसह देशातील अनेक भागात रात्री उशिरा झालेल्या पावसामुळे तापमानात घट नोंदवण्यात आली आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने (IMD) केरळच्या काही भागांसाठी ऑरेंज अलर्ट आणि यलो अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याने कन्नूर, कोझिकोड, वायनाड आणि कासरगोडसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला.
पावसाच्या इशाऱ्यामुळे अधिकाऱ्यांनी कन्नूर, कोझिकोड आणि वायनाडमधील शाळांना 24 जुलैपर्यंत सुट्टी जाहीर केली आहे. ANI नुसार, कन्नूर PSC परीक्षेच्या वेळापत्रकात कोणताही बदल झालेला नाही.
हवामान खात्यानुसार केरळ, किनारी आंध्र प्रदेश, यानाम, तेलंगणामध्ये पुढील पाच दिवस हलका पाऊस पडू शकतो. 27 जुलैपर्यंत केरळमध्ये 45-45-55 किमी प्रतितास वेगाने वाऱ्याचा वेग 65 किमीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. मुसळधार पाऊस आणि वादळ पाहता मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
कर्नाटकातील हुबळी शहरातील अनेक भागात मुसळधार पावसाची संततधार सुरू आहे. संततधार पावसामुळे नागरिकांचेही मोठे हाल होत आहेत.
उत्तराखंडमधील चमोलीच्या कामेडा गावाजवळ भूस्खलनामुळे बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग बंद झाला आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये देखील येणाऱ्या काही तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.